आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 18वा हंगाम आगामी वर्षी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटूंचा मेगा लिलाव होणार आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) सहा खेळाडूंना रिटेन केले असून 120 कोटी रुपयांच्या पर्समधून 17 कोटी रुपये खर्च केले आहेत, मात्र ‘बीसीसीआय’ने ‘केकेआर’च्या पर्समधून 12 कोटी रुपये कापले आहेत. खेळाडूंना आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या नियमानुसार पैसे न दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंसाठी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने निश्चित केलेल्या रुपयांपेक्षा कमी पैसे दिल्यास उर्वरित पैसे फ्रेंचायझीच्या पर्समधून कापले जातात. नेमके तेच केकेआर फ्रेंचायझीच्या बाबतीत घडले आहे. केकेआरने रिंकू सिंगला पहिला रिटेन केलेला खेळाडू म्हणून त्याला 13 कोटी रुपये दिले, तर आयपीएलच्या नियमांनुसार पहिल्या रिटेन केलेल्या खेळाडूला 18 कोटी द्यावे लागतात; परंतु केकेआरने या नियमाचा भंग केल्याने त्यांच्या पर्समधून 5 कोटी रुपये कापले गेले. तसेच वरुण चक्रवर्तीलाही दोन कोटी रुपये कमी दिले आहेत. तिसरा रिटेन खेळाडू म्हणून केकेआरने सुनील नरेनला 12 कोटी रुपये दिले, ज्यात त्यांनी आयपीएलने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा 1 कोटी रुपये जास्त खर्च केले. तसेच चौथ्या रिटेन केलेल्या खेळाडूला 18 कोटी रुपये द्यायला हवे होते, पण केकेआरने आंद्रे रसेलला 12 कोटी रुपये देऊन रिटेन केले. म्हणजे त्याला 6 कोटी रुपये कमी दिले. अशा प्रकारे केकेआरने केवळ 57 कोटी रुपये खर्च केले, पण त्यांच्या पर्समधून आयपीएलच्या नियमाचा भंग केल्याने 12 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे.
लिलावासाठी उरले फक्त 51 कोटी
आयपीएलच्या आगामी लिलावासाठी प्रत्येक संघासाठी 120 कोटींची पर्स निश्चित केली आहे. या 120 कोटींपैकी 57 कोटी रुपये केकेआरने संघाने 4 कॅप्ड आणि 2 अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्यासाठी खर्च केले. त्याचबरोबर आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या नियमाचा भंग केल्याने त्यांना 12 कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे आयपीएल 2025 च्या मोठय़ा लिलावातून उर्वरित खेळाडू खरेदी करण्यासाठी फक्त 51 कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी इतक्या कमी पैशात संघबांधणीसाठी चांगल्या खेळाडूंची निवड करणे सोपे काम असणार नाही.