आयपीएल 2025 च्या अनुषंगाने सर्व संघांनी आत्ता पासूनच संघ बांधणीला सुरुवात केली आहे. मुंबईचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार असल्याचे या आधीच निश्चित झाले आहे. त्याच बरोबर हैदराबाद, चेन्नई, राजस्थान व गुजरात या संघांनी सुद्धा आपापले कर्णधार निश्चित केले आहेत. मात्र, अजुनाही पाच संघांच्या कर्णधारांची नावं गुलदस्त्यात आहेत. असे असताना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) गोटातून मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईचा पठ्या अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर कर्णधार पदाची मोठी जबाबदारी देण्याच्या विचार केकेआर संघ व्यवस्थापन करत आहे.
आयीपएल 2025 साठी मेगा लिलाव प्रक्रिया सौदी अरबमधील जेद्दाह येथे पार पडली. या लिलाव प्रक्रियेमध्ये अजिंक्य रहाणेला कोलाकाता नाईट रायडर्सने 1.5 कोटी रुपये किंमतीला खरेदी केले होते. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाताने IPL 2024 च्या ट्रॉफीवर मोहर उमटवली होती. मात्र आगामी आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरला प्रीती झिंटाच्या मालकिचा असलेल्या पंजाब किंग्स या संघाने तब्बल 26.75 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले आहे. त्यामुळे कोलकाताचा संघ सध्या कर्णधारपदाच्या शोधात आहे.
संघामध्ये यंग खेळाडूंचा भरणा असला तरी कर्णधार पद सांभाळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी नाही. त्यामुळे कर्णधार पदाचा तगडा अनुभव असलेल्या अजिंक्य रहाणेला कर्णधार पद देण्या संदर्भात संघ विचार करत आहे. अजिंक्य रहाणेच केकेआर संघाचा कर्णधार होईल याची 90 टक्के शक्यता आहे. कारण अजिंक्य रहाणेला विशेष करून कर्णधार पदाच्या अनुषंगानेच खरेदी करण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे.
कर्णधार पदाच्या शर्यतीमध्ये अजिंक्य राहणे व्यतिरिक्त वेंकटेश अय्यरच्या नावाचा सुद्धा समावेश आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये केकेआरने व्यंकटेशला 23.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यामुळे अजिंक्य रहाणे किंवा व्यंकटेश अय्यर यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर कोलकाता संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येईल अशी शक्यता आहे. रणजी करंडकामध्ये मुंबईच्या संघाचे नेतृत्व अजिंक्य राहणेने केले होते. आगमी आयपीएलसाठी गुजरात संघाचे नेतृत्व शुभमन गिल, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिंन्स आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराच गायकवाड असणार आहे. मात्र, अजूनही कोलकाता, दिल्ली, पंजाब, बंगळुरू आणि लखनऊ हे संघ कर्णधार पदाच्या शोधात आहेत.