मुंबई प्ले ऑफ गाठणार, डिव्हिलियर्सचे भाकीत

आयपीएलच्या गेल्या मोसमात दहा पराभवांना सामोरे गेलेला मुंबई यंदा जोरदार खेळ करणार आणि प्ले ऑफ गाठणार, असे भाकीत खुद्द दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने वर्तवले आहे. आयपीएलचा हंगाम उद्यापासून सुरू होत असला तरी दिग्गजांनी आपले अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली असून डिव्हिलियर्सने मुंबईसह कोलकाता, बंगळुरू आणि गुजरात हे चार संघ प्ले ऑफमध्ये भिडतील असे अंदाज बांधले आहे. हे अंदाज बांधताना पाचवेळा आयपीएलला गवसणी घालणाऱ्या चेन्नईला टॉप फोरमधून डावलल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आयपीएलचे अठराव्या द्वंद्वाला कोलकाता विरुद्ध बंगळुरूच्या लढतीने ईडन गार्डन येथे प्रारंभ होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात लाडक्या विराट कोहलीच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच डिव्हिलियर्सने प्ले ऑफचे चित्र स्पष्ट केले आहे. त्याच्या ‘यूटय़ूब’ चॅनलवर डिव्हिलियर्स म्हणाला, मुंबई  प्ले ऑफमध्ये पोहोचू शकेल. तसेच मला खात्री आहे की, यावेळी बंगळुरूसुद्धा प्ले ऑफचा भाग असेल. कारण यावेळी बंगळुरूचा संघ संतुलित आहे. तसेच गुजरात आणि गतविजेता कोलकातादेखील प्ले ऑफच्या शर्यतीत असतील. हे माझे चार संघ आहेत जे प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. गेल्या मोसमात कोलकात्यासह बंगळुरू, हैदराबाद आणि राजस्थानने प्ले ऑफ गाठले होते. चेन्नई हा नक्कीच एक उत्तम संघ असून त्यांची ताकद खूप मोठी आहे. तरीही प्ले ऑफच्या शर्यतीमध्ये मी निवडलेल्या चार संघांनाच माझी पसंती राहील, असेही डिव्हिलियर्स म्हणाला.