IPL 2025 – आयपीएलची क्रिकेटगिरी आजपासून, कोलकाता-बंगळुरू यांच्यात रंगणार उद्घाटनीय लढत

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलच्या साडेतीन तासांच्या ब्लॉकबस्टर रनोत्सवाला कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने प्रारंभ होतोय. लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या आणि क्रिकेटविश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर स्वार असलेल्या आयपीएलच्या अठराव्या मोसमात नव्या नियमांमुळे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात प्रथमच श्रेष्ठत्वासाठी क्रिकेटगिरी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोघांच्या युद्धात क्रिकेटप्रेमींना क्रिकेटच्या उत्सवात धावांबरोबर विकेटचीही अनोखी फोडणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे 65 दिवस, 74 सामने आणि 13 स्टेडियम्सवर 230 पेक्षा अधिक खेळाडूंची क्रिकेटगिरी रंगेल.

आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाज हा मध्यवर्ती असतो आणि तो एखाद्या हीरोप्रमाणे गोलंदाजांची व्हिलनसारखी धू धू धुलाई करतो. पण यंदा आयपीएलमध्ये गोलंदाजांचेही वजन वाढावे म्हणून काही प्रयोग केले जाणार आहेत. त्यामुळे गोलंदाजांनाही बाहुबली होण्याची संधी लाभणार आहे. विशेष म्हणजे चेंडूंना चकाकी देण्यासाठी गोलंदाजांना लाळ लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर रात्री होणाऱ्या दुसऱ्या डावात दवामुळे चेंडूंचे काहीसे नुकसान होते. त्यामुळे 10 षटकांनंतर गोलंदाजांना चेंडू बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. हा नियम गोलंदाजांच्या पथ्यावर पडला तर धावांचा पाठलाग करणे कठीण असेल आणि गोलंदाजांसाठी दुसरा चेंडू सामना फिरवणारा ठरू शकतो. तसेच वाईड चेंडूंबाबतही रिह्यू मागण्याची सोय करण्यात आली आहे. अनेकदा उंचीवर असलेल्या तसेच ऑफस्टम्पबाहेरील वाईड चेंडूंबाबत पंचांना अचूक निर्णय देणे शक्य होत नाही. त्यामुळे आता हे चेंडू हॉक आय आणि बॉल ट्रकिंग प्रणालीचा अवलंब करून तपासले जाणार आहेत. म्हणजेच एखाद्या फलंदाजाला वाटले की चेंडू त्याच्या डोक्यावरून अथवा ऑफ साईडला वाईड रेषेच्या बाहेरून जात असतानाही पंचांनी वाईड दिला नसेल तर तो आता रिह्यू घेऊ शकतो. या नियमांसोबत इम्पॅक्ट प्लेअर आहेच.

पाच संघांनी बदलले कर्णधार

‘आयपीएल’च्या 18 व्या हंगामात तब्बल पाच संघांचे कर्णधार बदलण्यात आले आहेत. यामध्ये लखनौ, कोलकाता, पंजाब, बंगळुरू आणि दिल्ली या संघांचा समावेश आहे. लखनौने ऋषभ पंतला सर्वाधिक बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले आणि त्याला संघाचे कर्णधारपदही सोपविले. गेल्या वेळी तो दिल्लीचा कर्णध्रा होता, आता त्याच्या जागी अक्षर पटेल हा नवा कर्णधार दिल्लीला लाभला आहे. अक्षरप्रमाणे रजत पाटीदार बंगळुरूचे नेतृत्व सांभाळेल. गेल्या मोसमात कोलकात्याला जेतेपद जिंकून देणारा श्रेयस अय्यर आता पंजाबचा कर्णधार झाला आहे. गेल्या वर्षीचे संजू सॅमसन, शुभमन गिल, पॅट कमिन्स, ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पंडय़ा हेच कर्णधार कायम आहेत. तसेच गेल्या मोसमात कर्णधारपद सांभाळणारे के. एल. राहुल, शिखर धवन आणि फॅफ डय़ु प्लेसिस हे तिघेही जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. त्यामुळे रजत पाटीदार, अक्षर पटेल आणि अजिंक्य रहाणे हे तीन नवे कर्णधार आयपीएलमध्ये सामील झाले आहेत.

नव्या कर्णधारांमध्ये आज संघर्ष

आयपीएलच्या नव्या मोसमातील पहिला सामना चक्क दोन नव्या कर्णधारांमध्ये खेळला जाणार आहे. गतविजेत्या कोलकात्याचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे तर रजत पाटीदार बंगळुरूचे कर्णधारपद भूषविणार आहेत. हे दोघेही आयपीएलमध्ये प्रथमच नेतृत्व करणार आहेत. कोलकात्याची ताकद क्विंटन डिकॉक, सुनींल नरीन, आंद्रे रसल, रहमानुल्लाह गुरबाज आणि रिंकू सिंह या झंझावाती फलंदाजांमध्ये सामावली आहे. वरुण चक्रवर्थीचा अभूतपूर्व फॉर्म कोलकात्यासाठी बोनस ठरणार आहे. दुसरीकडे आजवर एकही आयपीएल न जिंकणारा बंगळुरू विराट कोहली, देवदत्त पडिक्कल आणि फिल सॉल्टच्या फटकेबाजीवर अवलंबून असेल.

n कोलकाता संघ अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, रोव्हमन पॉवेल, अंगक्रिष रघुवंशी, रहमानुल्लाह गुरबाज, रमनदीप सिंग, रिंकू सिंह,  लुवनित सिसोदिया, व्यंकटेश अय्यर, मोईन अली, सुनील नरीन, अनुकूल रॉय, आंद्रे रसल, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, मयांक मार्पंडे, एन्रीक नॉर्किया, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्थी, उमरान मलिक.

n बंगळुरू संघ रजत पाटीदार (कर्णधार), टीम डेव्हिड, स्वास्तिक चिकारा, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, जेकब बेथल, मनोज भंडगे, मोहित  राठी, लियाम लिव्हिंगस्टन, कृणाल पंडय़ा, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदस सिंग, जॉश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्नील सिंग, नुआन तुषारा, यश दयाल.

वॉर्नर, शॉची आठवण येणार

आयपीएलमध्ये यंदा अनेक दिग्गज खेळाडूंना कुणी भावच दिला नाही. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, केन विल्यम्सन, टॉम लॅथम, कायल जेमिसन, सरफराज खान, स्टीव्ह स्मिथ, शार्दुल  ठाकूर, डॅरिल मिचेल, अॅलेक्स पॅरीसारख्या अनेक दिग्गजांना कुणी विकत न घेतल्यामुळे ते यंदाच्या आयपीएलमध्ये दिसू शकणार नाहीत. सर्वात धक्कादायक म्हणजे आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या डेव्हिड वॉर्नरची गच्छंती न पटणारी आहे.

आयपीएलचे आकडे

n स्पर्धेत एकूण 74 सामने होणार असून यात 70 साखळी, तर चार प्लेऑफचे सामने होतील.

n नऊ दिवस म्हणजे शनिवार आणि रवीवारी प्रत्येकी दोन-दोन सामने खेळविले जातील.

n प्रत्येक संघ साखळी फेरीत 14 सामने खेळणार.

n गुणतालिकेतील पहिले चार संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

n गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये पहिला क्वॉलिफायर सामना होईल. यातील विजयी संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.

n तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांवरील संघ एलिमिनेटर सामना खेळतील. यातील विजयी संघ दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये पहिल्या क्वॉलिफायरमधील पराभूत संघाशी सामना खेळेल.

n दुसऱ्या क्वॉलिफायरमधील विजयी संघ अंतिम सामन्यात खेळेल.

n एलिमिनेटर लढत व दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यातील पराभूत संघांचे आव्हान संपुष्टात येईल.