इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंनी विजय हजारे स्पर्धेत वादळी खेळ केला आहे. हरयाणाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बाना आणि सुमित कुमार यांनी एकूण 96 चेंडू खेळले आणि 128 धावा चोपल्या. तर झारखंडच्या उत्कर्ष सिंह याने 5 षटकात फक्त 22 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. दिनेश बाना, सुमित कुमार आणि उत्कर्ष सिंह यांच्यावर आयपीएल 2024 मध्ये एकाही फ्रेंचायझीने बोली लावली नव्हती. तिघांचीही बेस प्राईज 30-30 लाख रुपये होती.
जयपूरच्या जयपुरिया विद्यालयाच्या मैदानावर झारखंड आणि हरयाणामध्ये सामना रंगला. झारखंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. हरयाणाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 विकेट गमावून 295 धावा केल्या. हिमांशु राणआ आणि अंकित कुमार यांनी पहिल्या विकेटसाठी 89 धावांची सलामी दिली. राणा 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला अशोक मेनारिया खातेही उघडू शकला नाही.
अशोक मेनारिया बाद झाल्यानंतर आलेल्या पार्थ वत्स आणि अंकित यांच्यात तिसऱ्या विकेटसाटी 49 धावांची भागिदारी झाली. पार्थ 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला निशांत सिंधू 9 धावांवर बाद झाला. तर अंकित कुमार याने 67 धावांची खेळी केली. राहुल तेवतियाही विशेष कमाल दाखवू शकला नाही. तो 3 धावांवर बाद झाला.
त्यानंतर मात्र यष्टीरक्षक दिनेश बाना आणि सुमित कुमार यांची जोडी जमली आणि दोघांनी 125 धावांची नाबाद भागिदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. दिनेशने 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 72 धावा केल्या, तर सुमित कुमारने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 56 धावा केल्या. झारखंडकडून उत्कर्ष सिंह याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.