आयपीएल लिलावात हिंदुस्थानींचाच बोलबाला, दहा फ्रेंचायझींकडून 639.15 कोटी खर्च

सौदी अरबच्या जेद्दाह शहरात दोन दिवस रंगलेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात विक्रमी बोलींचा बोलबाला होता. आयपीएलच्या दीडदशकांच्या इतिहासातील सर्वोच्च बोली याच लिलाव लागली आणि नवा इतिहास रचला गेला. या लिलावात 62 परदेशी खेळाडूंसह 182 क्रिकेटपटूंवर बोली लागली. याचबरोबर या लिलाव प्रक्रियेत ‘राइट टू मॅच’चा (आरटीएम) आठ वेळा वापर करण्यात आला. 10 फ्रेंचायझींनी मिळून एकूण 639.15 कोटी रुपये खर्च केले. या लिलावात ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला, 13 व्या वर्षी अंडर-19 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणारा बिहारचा डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीलाही आयपीएलची लॉटरी लागली. याचबरोबर अनेक दिग्गज स्टार खेळाडूंना या लिलावात किंमतच मिळाली नाही . त्यामुळे ते अनसोल्डच राहिले.

पंत, श्रेयस, व्यंकटेश ठरले महागडे खेळाडू

ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटींना, तर श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटींना खरेदी केले. याचबरोबर व्यंकटेश अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले. इंग्लंडचा जोस बटलर हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू होता, त्याला गुजरात टायटन्सने 15.75 कोटी रुपयांना विकत घेतले. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिससाठीही पंजाब किंग्जने 11 कोटी रुपये मोजले.

रथी-महारथी खेळाडूंचा भ्रमनिरास

आयपीएलच्या मेगा लिलावात ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ, किवी खेळाडू केन विल्यमसन आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर या रथी-महारथी खेळाडूंचा चांगलाच भ्रमनिरास झाला. कोणत्याच फ्रेंचायझींनी या स्टार खेळाडूंवर बोलीही लावली नाही. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकही विकला गेला नाही. याचबरोबर स्टीव्ह स्मिथ, जॉनी बेअरस्टो, डॅरिल मिशेलस, मुस्तफिजुर रहमान, शाय होप, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, सरफराझ खान, केशव महाराज, नवदीप सैनी, ज्युनियर एबी व शिवम मावी असे प्रतिभावान खेळाडूंही लिलावात दुर्लक्षितच राहिले.

13 वर्षांचा वैभव झाला करोडपती

राजस्थानने बिहारच्या 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. आता आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात लहान क्रिकेटपटू ठरला. वैभवने 19 वर्षांखालील स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. त्याने वयाच्या 12 व्या वर्षी प्रथम श्रेणीत पदार्पण केले अन् 13 व्या वर्षी तो आयपीएलमध्ये करोडपतीही झाला.

परदेशी खेळाडूंचा भाव घसरला

आयपीएलच्या इतिहासात प्रथमच परदेशी खेळाडूंचा भाव घसरलेला पाहायला मिळाला. आतापर्यंत लिलावात मोठी बोली देशी नव्हे तर परदेशी खेळाडूंवरच लावल्या जात होत्या. आतापर्यंत मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, सॅम करण, बेन स्टोक्स, खिस मॉरिस, निकोलस पूरनसारखे खेळाडूंच सर्वात महागडे ठरले होते. महागडय़ा खेळाडूंच्या यादीमध्ये परदेशी खेळाडूंचाच बोलबाला असायचा तो यावेळी लिलावात दिसला नाही.

अर्शदीप, युझवेंद्र यांचा गोलंदाजीत बोलबाला

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला पंजाब किंग्सने 18 कोटी रुपयांना विकत घेतले. युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजासाठी पंजाब किंग्जने 18 कोटी रुपये खर्च केले. जोश हेझलवूड, जोफ्रा आर्चर आणि ट्रेंट बोल्ट हे सर्वात महागडे विदेशी वेगवान गोलंदाज ठरले. तिघांनाही वेगवेगळय़ा संघांनी 12.50 कोटी रुपयांना विकत घेतले. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही चेन्नई सुपर किंग्जने 9.75 कोटींना विकत घेतले. अफगाणिस्तानचा नूर अहमद हा सर्वात महागडा विदेशी फिरकी गोलंदाज ठरला. त्याला चेन्नईने 10 कोटी रुपयांना विकत घेतले.