
पर्यवेक्षक दारू प्यायला होता. त्याने उत्तरपत्रिका फाडल्याचा आरोप करत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विद्यार्थ्याने पत्र लिहून दाद मागितली. पदरी निराशा पडल्याने त्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत मंत्री पाटील यांच्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याला नोटीस जारी केली आहे.
गौरव काकडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. न्या. अतुल चांदुरकर व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. न्यायालयाने उच्च व तंत्र शिक्षण खात्यासह पर्यवेक्षक पराग नावंदर व अन्य प्रतिवादींना नोटीस जारी केली. गौरवच्या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
z पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात गौरव विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. 11 जून 2024 झालेल्या परीक्षेचे पर्यवेक्षक नावंदर त्यावेळी दारू प्यायले होते. गैरवर्तन करून त्यांनी माझी 36 पानांची उतरपत्रिका फाडली. मंत्री पाटील यांच्यासह राज्यपाल, बार काwन्सिल, सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांना पत्र लिहिले. मला पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी व पर्यवेक्षक नावंदर यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती केली. मंत्री पाटील व राज्यपाल कार्यालयाकडून काहीच उत्तर मिळाले नाही. विद्यार्थी तक्रार निवारण समितीने यावर सुनावणी घेतली. माझ्या आरोपात तथ्य नाही. मीच उत्तरपत्रिका फाडली, असा निष्कर्ष समितीने नोंदवला. समितीचा हा अहवाल रद्द करावा. मला पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्याने केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवा
या घटनेशी निगडीत सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवण्याचे आदेश न्यायालयाने प्रतिवादींना द्यावेत, अशी मागणी गौरवने याचिकेत केली आहे. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.