सेन्सेक्स पुन्हा घसरला! गुंतवणूकदारांचे 5.12 लाख कोटी बुडाले

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. 1 जून रोजी 7 व्या टप्प्यातील मतदान संपण्याआधीच आता सर्व देशांचे लक्ष 4 जूनच्या निकालाकडे लागले आहे. परंतु, त्याआधीच शेअर बाजारात घसरण सुरू झाली आहे. शेअर बाजारात लागोपाठ घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना जबरदस्त फटका बसत आहे. सोमवारपासून ते गुरुवार पर्यंत अवघ्या चार दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल 5.12 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन आज कमी होऊन 411.21 लाख कोटी रुपयांवर खाली आले. बुधवारी 415.09 लाख कोटी होते.

शेअर बाजाराने आज सलग चौथ्या दिवशी गटांगळ्या खाल्ल्या. या आठवडय़ाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 617 अंकांनी घसरून 73,885 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 216 अंकांनी घसरून 22,488 अंकांवर बंद झाला. बीईएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी टाटा स्टीलचे शेअर्स जवळपास 6 टक्क्यांनी घसरले. यासोबत टायटन, टेक महिंद्रा आणि विप्रोचे शेअर 3 टक्के घसरले. पॉवरग्रीड, बजाज, फिनसर्व, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, इन्पहसिस, टीसीएस, जेएसडब्ल्यू, मारुती, आयटीसी, एचसीएलचे शेअर्सही घसरले. तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, ऑक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेलचे शेअर्स वाढीसोबत बंद झाले. गुरुवारी शेअर बाजार घसरणीसोबत उघडला. 323.98 अंकांच्या घसरणीसोबत बीएसीईचा सेन्सेक्स 74,846 अंकांच्या लेवलवर उघडला. परंतु, अवघ्या काही मिनिटांत सेन्सेक्स 74,529 अंकांपर्यंत खाली कोसळला. सेन्सेक्स सोबत निफ्टीनेही गटांगळ्या खाल्ल्या.