जास्त परताव्याच्या आमिषामुळे अनेकजण काही ठिकाणी गुंतवणूक करतात. सुरुवातीला गुंतवणूकदारांना चांगला आणि वेळोवेळी परतावा देण्यात येतो. त्यामुळे त्यांचा विश्वास वाढतो. त्यामुळे ते आयुष्याची जमापुंजी त्यात गुतंवतात. मात्र, नंतर त्या कंपनीलाच टाळे लागते आणि गुतंवणूकदारांची जमापुंजी लुटली जाते. त्यामुळे त्यांच्यासमोर भवितव्याचा मोठा प्रश्न उभा राहतो. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील टोरेस कंपनीने ग्राहकांना कोटयवधींचा गंडा घातला आहे.
मुंबईतील टोरेस या खाजगी कंपनीने गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आमीष दाखवले होते. टोरेस ही आर्टिफिशल डायमंड विक्री करणारी कंपनी आहे. टोरेस कंपनीने लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची ऑफर दिली होती. तसेच आटर्टिफिशल डायमंड गुतंवणूक केल्यास किंवा पैसे भरल्यास त्यांच्या गुंतवणुकीवर आठवड्याला ठराविक टक्केवारीने रक्कम खात्यात जमा करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारी कंपनीच्या भआईदंर आणि दादर येथील कार्यालयाला टाळे लागले होते.
कंपनीला टाळे लागल्याचे वृत्त पसरताच मुंबईत दादर येथील टोरेस कंपनीबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. कंपनीनं दिलेल्या आश्वासनानुसार हप्ते मिळत नसल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी केली आहे. सुरुवातीला कंपनीकडून काही हप्ते देण्यात आले पण गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याचं ग्राहकांनी सांगितले. भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याचं आश्वासन कंपनीकडून देण्यात आलं होतं. गेल्या वर्षभरापासून ही कंपनी मुंबईत विविध ठिकाणी काम करत आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत गुंतवणूकदारांना हप्ते मिळत होते. पण गेल्या दोन आठवड्यांपासून हप्ते मिळत नसल्याचं गुंतवणूकदारांनी सांगितले.
टोरेस कंपनीच्या दादर येथील कार्यालयाबाहेर गर्दी झाल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
मुंबईसह नवी मुंबई, मिराभाईंदर येथेही टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेरही गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे. नवी मुंबईच्या कार्यालयावर तर गुंतवणूकदरांनी दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला आहे. शोरूमबाहेर काहींनी निदर्शने केली, तर काहींनी पोलिसांत तक्रारी केल्या. मिरा भाईंदर पोलिसांनी याबाबत गुंतवणूकदारांकडून तक्रारी स्वीकारण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून कंपनीच्या मालक आणि संचालकांची माहिती गोळा करण्यात येत आहे.