अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास सीबीआयकडे! मुंबई पोलिसांना चपराक

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करीत उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचला मोठा झटका दिला. हत्येच्या तपासात अनेक गंभीर त्रुटी आहेत. पोलिसांनी गुह्याच्या सर्व पैलूंचा विचार करून तपास केलेलाच नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. याचवेळी हे प्रकरण दोन आठवड्यांत सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले.

दहिसर, बोरिवलीतील शिवसेनेचे वर्चस्व खुपल्यानेच अभिषेक यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचला गेला. मात्र पोलिसांनी राजकीय दबावाखाली तपास करीत मुख्य सूत्रधारांची पाठराखण केली, असा दावा करीत अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती व तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने शुक्रवारी निकाल दिला. यावेळी खंडपीठाने पोलिसांवर ताशेरे ओढत हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. या निर्णयाने राजकीय दबावाखाली चाललेल्या तपासाला मोठा झटका बसला आहे.

पोलीस अधीक्षक दर्जाचा आयपीएस अधिकारी नेमा

अभिषेक यांच्या हत्येचा कसून तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच क्राईम ब्रँचने दोन आठवड्यांत तपासाची सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपूर्द करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. 8 फेब्रुवारीला बोरिवली येथे मॉरिस नरोन्हाच्या कार्यालयात फेसबुक लाईव्हदरम्यान अभिषेक यांची गोळ्या झाडून हत्या केली गेली. ही घटना सर्वांनाच हादरवून सोडणारी होती, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कोर्टाची निरीक्षणे

क्राईम ब्रँचने हत्येचा सर्व पैलूने सखोल तपास केलेला नाही. अशा प्रकारचा हलगर्जीपणा सुरू ठेवण्यास मुभा देणार नाही. हा न्यायाचा घात ठरेल. न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी हे प्रकरण सीबीआयसारख्या स्वतंत्र यंत्रणेकडेच सोपवणे योग्य आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष पद्धतीने तपास झालाच पाहिजे.

7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मॉरिस नरोन्हा, मेहुल पारेख व इतर दोघे जेवण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. ते पहाटे लवकर घरी परतले. मधल्या काळात तेथे काय घडले, याचा योग्य तपास केलेला नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साडी वाटप कार्यक्रमाबाबत मेहुलला काही माहीत नव्हते, मात्र उपलब्ध पुराव्यांवरून मेहुल आदल्या दिवशीच्या सायंकाळी अभिषेक यांना साड्यांचे सॅम्पल्स दाखवण्यासाठी गेला होता.