वेश-नाव बदलून विमान प्रवास करणाऱ्या अजित पवार यांची चौकशी करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाव व वेश बदलून विमान प्रवास करण्याची गरजच काय होती? अमित शहा आणि अजित पवार यांच्यात काय शिजत होते? उद्या अतिरेक्याने वेश बदलून प्रवास केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे या विमान प्रवासाची आणि एअरलाईन्स पंपनीची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत दहा वेळा भेट घेतल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दिली. मुंबई ते नवी दिल्ली विमान प्रवास करताना तोंडाला मास्क आणि टोपी घातली. वेश बदलल्यामुळे मला कोणी ओळखले नाही. विमानतळावर ओळख लपवण्यासाठी विमान तिकीट अजित पवार या नावाऐवजी ए.ए. पवार या नावाने बोर्डिंग पास घेतल्याचीही त्यांनी गप्पांच्या ओघात कबुली दिली. मात्र वेश व नाव बदलून विमान प्रवास करणाऱया अजित पवार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी कडक शब्दांत समाचार घेताना प्रश्नांची सरबत्तीच केली आणि मुंबई, दिल्ली विमानतळासह एअरलाईन्स पंपनीची चौकशी करण्याचीही मागणी केली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार नाव बदलून विमान प्रवास करतात, आज अजित पवार असे नाव बदलून प्रवास करतात, उद्या एखादा अतिरेकी हेच उदाहरण घेऊन असे कृत्य करेल. हा पूर्णपणे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. एअरलाईन्स पंपनीने ज्यांना ओळखत नाही त्यांना प्रवासाची परवानगी कशी दिली? आम्हाला आधार कार्ड दिले जाते. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानेही याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

…तर जबाबदारी घेणार का?
अशाच प्रकारे एखादा अतिरेकी देशात आला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुळात अजित पवार हे चोरून वेश बदलून अमित शहांना का भेटत होते? अजित पवार त्यांच्या सोबत गेले त्याच्या केवळ पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. एकीकडे मोदी अजित पवारांवर आरोप करीत होते आणि दुसरीकडे अजित पवार अमित शहा यांची भेट घेत होते. नेगोशिएट करीत होते. मग खाऊंगा ना खाने दुंगा गेले कुठे? हे वॉशिंग मशीन नाही का? सगळे म्हणतात, भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी झालीय. आता देवेंद्र फडणवीस आणि मोदीच याचे उत्तर देतील, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.