शेअर मार्केटमध्ये गुंतवा आणि चांगला परतावा मिळवा अशी बतावणी करत नागरिकांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या मध्यप्रदेशातील एक बोगस काँल सेंटरचा कारभार माटुंगा पोलिसांनी उद्धवस्त केला. पोलिसांनी तिघा भामट्यांना बेड्या ठोकून विविध साहित्य जप्त केले. आरोपींनी अनेकांची आर्थिक फसवणुक केल्याचे समोर आले आहे.
माटुंगा येथे राहणारे चंद्रशेखर तावरे (56) यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून कॉल आला व समोरच्या व्यक्तीने तावरे यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत माहिती दिली. Profit bull & M/S L b enterprises या कंपनीबाबत अधिकची माहिती देऊन कंपनीच्या नावे एक बनावट लिंक पाठवली. या लिंकद्वारे Profit bull हे अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून गुंतवणुक करा आणि चांगला परतावा मिळवा असे सांगितले. तसेच तावरे यांचा विश्वास बसावा याकरिता सुरूवातीला 7500 रुपयांच्या गुंतवणुकीवर इलेक्ट्राँनिक माध्यमाचा वापर करून चांगले रिटर्न दाखवले. तावरे त्याला भुलले आणि गुंतवुकीस राजी होताच भामट्यांनी त्यांना अँप मध्ये लाँगिन करण्यास सांगून एनएएफटी व युपीआय द्वारे वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास शिताफिने भाग पाडले. तावरे यांनी झटपट पैशांच्या मोहापायी आठ लाख ३३ हजार रुपये भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे बँक खात्यात जमा केले. दरम्यान तावरे यांच्या मनात संशयाची पाल चुकचूकल्याने त्यांनी ती रकम पुन्हा काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही. शिवाय त्यांनी आरोपीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेही निर्थक ठरले. अखेर फसवणुक झाल्याचे स्पष्ट होताच तावरे यांनी माटुंगा पोलिसांत धाव घेतली.
मुंबई विमानतळ मग इंदौरमध्ये कारवाई
तावरे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिगंबर पगार तसेच संतोष पवार, मंगेश जऱ्हाड या पथकाने तपास सुरू केला. ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खात्यांचा अभ्यास करून पथकाने मुंबई विमानतळावर राज बहाद्दूर भदोरिया (63) या भामट्याला पकडले. त्यांच्या चौकशीतुन एमपीच्या इंदौर येथे बोगस काँल सेंटर थाटून बसलेल्या अंकित उर्फ राजकुमार शिंदे (30) आणि करण बैरागी (28) अशा दोघांना पकडले. त्यांचे काही साथीदार हाती लागले नाही. पोलिसांनी या भामट्यांकडून डेबिट व क्रेटीड कार्ड, विविध बँकांचे धनादेश, 19 मोबाईल, 20 सामकार्ड, लँपटाँप, राऊटर, तीन लाखांहून अधिक मोबाईल धारकांची माहिती पोलिसांनी जप्त केली.
भदोरियाचा बँक खात्यांचा झोल
इंदोरचा असलेला भदोरिया वेगवेगळ्या ठिकाणी कंपनी स्थापन करायचा. मग त्या कंपनीच्या नावे विविध बँकांत खाते खोलतो. मग बोगस काँल सेंटरमधून फसविलेल्या नागरिकांचे पैसे त्या बँक खात्यात जमा करायचे. ती रोकड मग मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून अन्य बँक खात्यात वळते करून भदोरिया मुख्य आरोपींना पाठवायचा. तो मिरा रोड येथे कंपनी स्थापन करण्यासाठी मुंबईत आला आणि पोलिसांच्या हाती लागला. पोलिस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.