डेटिंग अ‍ॅपद्वारे पुरुषांची फसवणूक करायची, मग नशेचे इंजेक्शन देऊन पैसे चोरायची; महिलेला पोलिसांकडून अटक

डेटिंग अ‍ॅपच्या मदतीने पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लुटणाऱ्या 43 वर्षीय महिलेला मेक्सिको पोलिसांनी अटक केली आहे. महिलेवर 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी फसवणूक झालेल्या पीडित पुरुषांनी तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

ऑरोरा फेल्प्स असे या महिलेचे नाव असून ती लास वेगासमधील रहिवासी आहे. ऑरोराने केवळ पुरुषांची फसवणूकच केली नाही, तर त्यांना नशेचे इंजेक्शन देऊन त्यांचे पैसे आणि आर्थिक माहिती चोरायची. या महिलेने पुरुषांची फसवणूक करून त्यांच्या गाड्या चोरल्या, त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले. तसेच त्यांच्या क्रेडिट कार्ड सोने आणि अनेक मौल्यवान वस्तू खरेदी करायची.

फेल्प्सवर एका व्यक्तीची हत्या केल्याचाही आरोप आहे. फेल्प्सने पीडित व्यक्तीला बेशुद्ध करून त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला व्हिलचेअरवर बसवून अमेरिका-मेक्सिको सीमेपार एका हॉटेलच्या रुममध्ये नेले. तेथे तो मृत आढळला होता.

फेल्प्सने टिंडर, हिंज आणि बंबल यासारख्या लोकप्रिय डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करून पुरुषांची फसवणूक केली. फेल्प्स फसवणूक आणि अपहरणाच्या एका गुन्ह्यात दोषी आढळल्यास तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.