व्हिसा अर्जात खोटी माहिती दिल्यास महागात पडणार, ‘यूएससीआयएस’ने दिला स्थलांतरितांना इशारा

तुम्ही तुमच्या नागरिकत्व अर्जात खोटी माहिती दिली तर आम्हाला कळेल, असा थेट इशारा गुरुवारी यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने (यूएसआयएस) दिला. नागरिकत्व अर्जामध्ये इस्लामिक स्टेट गटाशी संबंध असल्याची माहिती एका व्यक्तीने लपवल्याचे उघड झाल्यानंतर यूएसआयएसने समस्त स्थलांतरितांना हा इशारा दिला.

अमेरिकन अ‍ॅटर्नी ऑफिसने दिलेल्या माहितीनुसासर, न्यू जर्सी येथील एडिसन येथील 44 वर्षीय गफूर अब्दुदझामिलोविच अलियेव याच्यावर खोटी विधाने केल्याचा आणि खोटी साक्ष दिल्याचा आरोप आहे. संघीय अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, 2018 ते 2020 दरम्यान, गफूर अलियेव हा इसिसच्या जोडलेल्या अनेक एन्क्रिप्टेड मेसेजिंग चॅनेलमध्ये सक्रिय होता. या चॅनेलचा वापर हा सदस्यत्व, समर्थक आणि संभाव्य भरती करणाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी केला जात होता. असे असतानाही अलियेव्हने डिसेंबर 2020 मध्ये दाखल केलेल्या त्याच्या नागरिकत्व अर्जात घोषित केले की, तो कधीही दहशतवादी संघटनेशी संबंधित नव्हता. अमेरिकेतील इमिग्रेशन फॉर्ममध्ये चुकीची माहिती देण्याचा हा एकमेव खटला नाही.

अमेरिकेचा कायदा काय सांगतो…

अमेरिकेतील इमिग्रेशन कायद्यानुसार, अर्जांमध्ये चुकीची माहिती दिल्यास एखाद्या व्यक्तीला प्रवेश नाकारला जाऊ शकतो. देशात प्रवेश रोखला जाऊ शकतो किंवा आधीच तिथे राहात असेल तर त्याला देशाबाहेर काढण्यास भाग पाडले जाऊ शकते.

इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, काही अर्जदारांना असे वाटते की काही तथ्ये वगळल्याने त्यांच्या केसला मदत होईल, पण तसे नाही. खोटे बोलणे, मग ते कुटुंबातील सदस्यांबद्दल असो, गुन्हेगारी रेकॉर्ड असो किंवा संघटनात्मक संबंध असो, दीर्घकालीन परिणामांना सामोरे जावे लागेल.