डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम आयातीवर 25 टक्के कर लादणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या व्यापार धोरणासंबंधी सोमवारी मोठी घोषणा केली. अमेरिका सर्व स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम आयातीवर 25 टक्के कर लादणार आहे. हा कर अतिरिक्त धातू शुल्कांव्यतिरिक्त असून आठवड्याच्या अखेरीस ते जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे.

रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प बोलत होते. मंगळवारपासून ते परस्पर शुल्क जाहीर करतील, जे तात्काळ लागू होतील, असे ट्रम्प म्हणाले. तथापि, हे परस्पर शुल्क कुणाला लागू केले जातील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. असे असले तरी अन्य देशांच्या कर दराशी मिळते जुळते असेल आणि सर्व देशांना लागू असेल, असे ट्रम्प यांनी पुढे नमूद केले. म्हणजेच, जो देश यापुढे अमेरिकेला शुल्क आकारेल त्याला अमेरिका शुल्क आकारेल, अशी परस्पर शुल्क योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी 2016-2020 मध्ये त्यांच्या व्हाईट हाऊसमधील पहिल्या कार्यकाळात, स्टीलवर 25 टक्के आणि अ‍ॅल्युमिनियमवर 10 टक्के कर लादला होता. परंतु नंतर त्यांनी कॅनडा, मेक्सिको आणि ब्राझीलसह अनेक व्यापारी भागीदारांना शुल्कमुक्त कोटा मंजूर केला. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ब्रिटन, जपान आणि युरोपियन युनियनला हा कोटा वाढवला​आणि अलिकडच्या वर्षांत अमेरिकेच्या स्टील मिलच्या क्षमतेचा वापर कमी झाला आहे.