शेअर बाजारातील घसरण पाच वर्षांतील सर्वात वाईट अनुभव; हार्वर्डच्या प्राध्यापकांनी दिले धोक्याचे संकेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन आयात शुल्क लादल्यानंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये शुक्रवारी प्रचंड घसरण झाली. त्यामुळे वॉल स्ट्रीटमध्ये आणखी नुकसान होण्याचे संकेत मिळाले आहेत ट्रम्प प्रशासनाने लागू केलेल्या आयात शुल्कांमुळे चीनचे अमेरिकन इक्विटीजमधून 2.4 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्याचा बदला घेत चीनने देखील नवीन कर लागू केले आहेत. या सर्व घडामोडींचा हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही मोठा परिणाम झाला आहे.

शेअर बाजारात शुक्रवारी झालेली घसरण पाच वर्षांतील सर्वात वाईट अनुभव आहे, अशी प्रतिक्रिया हार्वर्डचे प्राध्यापक लॉरेन्स समर्स यांनी दिली आहे. शेअर बाजारातील हे चित्र धोकादायक असल्याचे सांगत समर्स यांनी आर्थिक टप्प्यावर धोक्याचे संकेत दिले आहेत. समर्स यांनी हिलरी क्लिंटन आणि बराक ओबामा यांच्यासोबत काम केलेले आहे. आजचा दिवस शेअर बाजारातील पाच वर्षांतील सर्वात वाईट अनुभव होता. सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्हाला शेअर बाजारात भयानक अनुभव येतो, तेव्हा एकतर बँक बुडाल्यामुळे, साथीच्या रोगामुळे, वादळामुळे किंवा दुसऱ्या देशाने काहीतरी केल्यामुळे होते, असे समर्स यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले.

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने आयात शुल्क लागू केलेल्या देशांमध्ये हिंदुस्थान, चीन, कॅनडा, मॅक्सिको, व्हिएतनाम आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांचा समावेश आहे.