दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा ‘यू टर्न’; काही तासातच मार्शल लॉ मागे घेतला

इस्रायल- हमास, लेबेनॉन, इराण येथील परिस्थितीमुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. तसेच युक्रेन आणि रशियातच संघर्ष सुरुच आहे. त्यातच आता दक्षिण कोरिया चर्चेत आले होते. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी मार्शल लॉ लागू करण्याचा त्यांचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात गदारळ झाल्यानंतर त्यांनी अवघ्या 6 तासांच्या आत मार्शल लॉचा निर्णय मागे घेतला. कोरिया हेराल्डने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील नागरिकांची निदर्शने आणि त्यांचा रोष पाहता राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी सकाळी त्यांचा आदेश मागे घेत नॅशनल असेब्लींची विनंती मान्य केली. मार्शल लॉची त्यांची अचानक घोषणा अल्पायुषी होती हेही त्यांनी मान्य केलं. आपण ताबडतोब नॅशनल असेंब्लीची विनंती स्वीकारत आहे आणि कॅबिनेटद्वारे मार्शल लॉ उठवत आहे, असे युन यांनी राष्ट्राला संबोधित करताना सांगितले. त्यांच्या संबोधनानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आणि मार्शल लॉ हटवण्यास मंजुरी देण्यात आली. लोकांच्या रोषानंतर त्यांना आदेश मागे घ्यावा लागला आहे.

मंगळवारी संध्याकाळी उशिरा राष्ट्राध्यक्ष यून यांनी “राज्यविरोधी शक्तींचा नायनाट करण्याची” गरज सांगून मार्शल लॉ जाहीर करून संपूर्ण देशाला धक्का दिला होता. या घोषणेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास विधानसभेचे तातडीचे पूर्ण अधिवेशन बोलावले. यावेळी नॅशनल असेंब्लीमध्ये उपस्थित असलेल्या 190 खासदारांनी राष्ट्राध्यक्ष यून यांच्या मार्शल लॉच्या घोषणेच्या विरोधात मतदान केले. कोरियाच्या मुख्य विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीसह उदारमतवादी पक्षांने यावेळी नॅशनल असेंब्लीमध्ये बहुतांश जागा जिंकल्या आहेत. मार्शल लॉ लागू करण्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयानतंर देशभरात बराच गदारोळ झाला. या घोषणेनंतर सेना, विरोधी पक्षाचे खासदार आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. जनतेचा प्रचंड विरोध आणि रोष पाहून अखेर राष्ट्राध्यक्षांना त्यांचा आदेश मागे घ्यावा लागला.