![donald trump and pm modi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/donald-trump-and-pm-modi-696x447.jpg)
मायदेशात पत्रकार परिषदा घेण्याचे टाळणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी अमेरिकेत देश-विदेशातील पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड देताना चांगलीच भंबेरी उडाली. या वेळी उद्योजक गौतम अदानीवरील लाचलुचपतीच्या आरोपांपासून, हिंदुस्थानी स्थलांतरितांना अमेरिकी लष्कराकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीपर्यंतच्या विविध अडचणींच्या प्रश्नांचा मारा पत्रकारांनी केला. अर्थात अदानीवर न्यूयॉर्कच्या न्यायालयाने ठेवलेल्या लाचलुचपतीच्या ठपक्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला वैयक्तिक विषय असे उत्तर देऊन मोदींनी या वेळीही बगल दिली. व्हाईट हाऊस येथील ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची भेट घेतली. ट्रम्प यांच्या भेटीनंतर उभयतांनी ही पत्रकार परिषद घेतली.
हिंदुस्थान हा लोकशाही देश आहे. आमची संस्कृती आणि तत्त्वज्ञान हे वसुधैव कुटुंबकम विचारसरणी मानणारे आहे. मी प्रत्येक हिंदुस्थानी आपला आहे, असे मानतो. तसेच जेव्हा दोन जागतिक नेते भेटत असतात तेव्हा अशा वैयक्तिक विषयावर चर्चा होत नसते, असे सांगत मोदी यांनी ट्रम्प यांच्या समवेत अदानीवरील आरोपांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. अदानी यांनी सौर ऊर्जेची कंत्राटे मिळवण्याकरिता हिंदुस्थानी अधिकाऱयांना 2,100 कोटी चारल्याचा ठपका अमेरिकेच्या न्याय विभागाने ठेवला आहे. या प्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कार्यवाहीला ट्रम्प यांच्यामुळे तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.
अमेरिकेतील हिंदुस्थानी घुसखोरांच्या प्रश्नावरही मोदी बोलले. हा प्रश्न केवळ हिंदुस्थानाचा नसून जागतिक आहे. जे अवैधपणे अमेरिकेत राहत आहेत, त्यांना परत घेण्यासाठी हिंदुस्थान तयार आहे, असे मोदी यांनी सांगितले. घुसखोरी करणारे अत्यंत सामान्य घरातील लोक असतात. त्यांना फसवून अन्य देशांत नेले जाते. त्यांना हिंदुस्थानात परत घेऊ. हिंदुस्थानींना परत पाठविण्याच्या प्रश्नावर सहकार्य करण्याचे ट्रम्प यांनी मान्य केले आहे, असे मोदी यांनी सांगितले.
रशिया-युक्रेनबाबत हिंदुस्थान तटस्थ नाही
रशिया-युक्रेन युद्धाबाबत हिंदुस्थान तटस्थ आहे असे जगाला वाटते, परंतु हिंदुस्थानची भूमिका तटस्थ नाही. हिंदुस्थान नेहमीच शांततेच्या बाजूने राहिला आहे. दोन्ही बाजूंनी चर्चा व्हावी असे आम्ही नेहमीच म्हटले आहे. मी दोन्ही देशांच्या नेत्यांची भेट घेतली. मी पुतीन यांना भेटलो तेव्हा ‘हा युद्धाचा काळ’ नाही असे सांगितले होते. युद्धभूमीवर उपाय शोधता येत नाहीत, असेही मी म्हटले होते. केवळ चर्चेतून यावर तोडगा निघू शकतो, असे मोदी म्हणाले.
मोदींनी अदानींच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकला!
अमेरिकेत मोदींनी अदानींच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकला. देशात प्रश्न विचारला तर ते गप्प राहतात. विदेशात प्रश्न विचारल्यास खासगी मुद्दा असल्याचे सांगतात. मित्राचा खिसा भरणे मोदींसाठी राष्ट्रनिर्माण आहे. लाचखोरी व देशाची संपत्ती लुटणे हा त्यांच्यासाठी व्यक्तिगत मुद्दा बनला आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास मंजुरी
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर ट्रम्प प्रशासनाने शिक्कामोर्तब केले असून त्याला लवकरच हिंदुस्थानच्या स्वाधीन केले जाईल. राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी देताना ट्रम्प यांनी त्याचा उल्लेख अत्यंत वाईट व्यक्ती असा केला.
आयात शुल्क लादण्यावर ट्रम्प सरकार ठाम
आयात शुल्क लादण्याच्या निर्णयावर ट्रम्प सरकार ठाम आहे. हिंदुस्थान अमेरिकेकडून तेल, गॅस आणि लष्करी सामुग्री अधिक प्रमाणात खरेदी करणार आहे. मात्र परस्पर आयात शुल्कातून अमेरिका हिंदुस्थानला वगळणार नाही. हिंदुस्थान आपल्यावर जितके कर लादेल तितके आपण लादू, असे सांगत ट्रम्प यांनी आयात शुल्कातून हिंदुस्थानला दिलासा देण्यास नकार दिला.