अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये भीषण आग, दोघांचा मृत्यू, 70 हजार नागरिकांना वाचवले

अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण अग्नीतांडव सुरू आहे. ही आग आता शहराकडे वेगाने पसरत असून यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. आतापर्यंत 70 हजारांहून अधिक नागरिकांना वाचवण्यात आले आहे. आगीमुळे शहरातील एक हजाराहून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत, असे अग्निशमन प्रमुख अँथनी मॅरोन यांनी सांगितले.

वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत आहे. मंगळवारी ही आग लागली असून वाऱ्यामुळे विझवण्यात अडचणी येत आहे. आगीत पॅसिफिक पॅलिसेड्स परिसरात सर्वाधिक नुकसान झाले. पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये 5 हजार एकरहून अधिक, पासाडेनाजवळील अल्ताडेना येथे 2 हजार एकरपेक्षा अधिक तर सॅन फर्नांडो व्हॅलीमधील सिलमार येथे 500 एकरपेक्षा अधिक परिसर आगीच्या भक्षस्थानी गेला आहे.

आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरल्याने लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. मदतीसाठी 10 अग्निशमन हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. यूएस फॉरेस्ट सर्व्हिसचे 5 मोठ्या एअर टँकरद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.