
संपूर्ण जगाला धमकावणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना जशास तसे उत्तर देण्याचे धोरण इराणचे आहे. तुम्ही आम्हाला धमक्या देत असाल तर आम्हाला तुमच्याशी चर्चाही करायची इच्छा नाही. जे काय करायचे आहे ते तुम्ही करा. मुळात अमेरिकेने आम्हाला आदेश देऊ नयेत, अशा शब्दांत इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी अमेरिकेला ठणकावले. ट्रम्प यांनी फोनवरून इराणला धमकावण्याचा प्रयत्न करताच इराणने अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ट्रम्प यांच्या आक्रमक निर्णयांचे जगभर पडसाद उमटत आहेत.
एका भाषणात बोलताना इराणच्या अध्यक्षांनी दंड थोपटले आहेत. ट्रम्प यांना उद्देशून पेजेशकियन म्हणाले की, काही दिवसांपूर्वी तुम्ही युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत ज्या पद्धतीने वागले त्याची लाज वाटायला हवी. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. या शाब्दिक वादानंतर ट्रम्प यांनी युक्रेनवर बोचरी टीका केली.