राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या आदेशानुसार अमेरिकेने अवैध स्थलांतरितांविरोधात अभियान सुरू केले आहे. या अभिनयाअंतर्गत सोमवारी अमेरिकेतून हिंदुस्थानींना घेऊन पहिले विमान रवाना झाले आहे. अमेरिकन लष्कराचे सी-17 विमान स्थलांतरितांना घेऊन हिंदुस्थानात येत आहे. हे विमान 24 तासांच्या आत हिंदुस्थानात पोहचेल, अशी अमेरिकन अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे.
ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर ही पहिलीच हद्दपारीची कारवाई आहे. अमेरिकेतील अवैध हिंदुस्थानी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली होती. यापूर्वी, हिंदुस्थानने अवैध स्थलांतरितांना परत घेण्यास सहमती दर्शविली होती.
ट्रम्प प्रशासनाने अवैध स्थलांतरितांविरुद्धच्या या मोहिमेत अमेरिकन सैन्याचीही मदत घेतली आहे. अमेरिका-मेक्सिको सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले असून स्थलांतरितांना ठेवण्यासाठी लष्करी तळांचा वापर केला जात आहे. अवैध स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी लष्करी विमानांचा वापर केला जात आहे.