“…तर संपूर्ण युक्रेनची फ्रंटलाइन कोसळेल”, एलोन मस्क यांचा इशारा

दोन वर्षाहून अधिक काळापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून दोन्ही देशातील संघर्ष तीव्र झाला आहे. हे थांबवण्यासाठी सध्या शांतता करारावर चर्चा सुरू असतानाच अमेरिकन अब्जाधीश आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क यांनी युक्रेनला इशारा दिला आहे. जर स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट प्रणाली बंद केली तर युक्रेनची संपूर्ण आघाडी कोसळेल, असा इशारा मस्क यांनी दिला.

स्टारलिंक प्रणाली युद्धभूमीवर लष्करी संवादाचा मुख्य आधारस्तंभ बनली आहे. त्यामुळे मस्क यांचे हे विधान पाश्चात्य देश आणि युक्रेनियन सरकारसाठी मोठा धक्का मानले जात आहे.

काय म्हणाले एलोन मस्क?

एलोन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर युक्रेनला इशारा दिला आहे. “मी पुतिन यांना युक्रेनवर आमनेसामने प्रत्यक्ष लढाईचे आव्हान दिले आहे आणि माझी स्टारलिंक प्रणाली युक्रेनियन सैन्याचा कणा आहे. जर मी ती बंद केली तर त्यांची संपूर्ण आघाडी कोसळेल”, असे मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मस्क यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनाही लक्ष्य केले आहे. झेलेन्स्की जबरदस्तीने युद्ध ओढवत आहेत आणि ते “भ्रष्टाचाराचा कधीही न संपणारा खेळ” बनले आहेत, असे मस्क पुढे म्हणाले.