ऐकावं ते नवलच! ट्रम्प यांनी निर्जन बेटांवरही लादला कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर त्यांचे टॅरिफ अस्त्र उगारले आहे. यातून निर्जन बेटेदेखील सुटलेली नाहीत. म्हणजे ज्या प्रदेशात कुणी राहत नाही, त्या प्रदेशावरही त्यांनी कर लादला आहे. हर्ड आणि मॅकडोनाल्ड अशी या बेटांची नावे आहेत.

तिथे माणसांचे वास्तव नाही तरी या बेटांकडून 10 टक्के कर आकारण्यात येणार आहे. नेमका हा कर कशासाठी लावला, अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटे दक्षिण महासागरात आहेत. ही बेटे अंटार्क्टिकापासून सुमारे 1,700 किलोमीटर आणि पर्थपासून सुमारे 4,100 किलोमीटर नैऋत्य दिशेला आहेत. या बेटांपर्यंत पोहोचायचे असल्यास पर्थपासून दोन आठड्यांचा बोट प्रवास करावा लागतो. मुख्य म्हणजे हर्ड या बेटावर बिग बेन या नावाने ओळखला जाणारा एक सक्रिय ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी समुद्रसपाटीपासून 2,745 मीटर उंच आहे आणि तो बर्फ व हिमनद्यांनी व्यापलेला आहे, तर मॅकडोनाल्ड बेट हे खूपच लहान आहे. फक्त 100 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे.

हर्ड व मॅकडोनाल्ड ही दोन्ही बेटे पूर्णपणे निर्जन आहेत. या बेटांवर माणसांचे वास्तव्य नाही. या बेटांवर जवळ जवळ एक दशकापूर्वी माणसांची नोंद करण्यात आली होती. असे असले तरी ही बेटे समुद्री पक्षी आणि सस्तन प्राण्यांसाठीचा एक महत्त्वाचा अधिवास आहेत.