
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील उत्पादनांवर तब्बल 125 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादून चीनची पुन्हा व्यापारकोंडी केली. ट्रम्प यांनी तब्बल 75 देशांवरील आयात शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित केले, परंतु चीनला या सवलतीपासून बाहेर ठेवले. यावर ट्रम्प यांच्या धमक्यांना घाबरणार नाही, परंतु चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा करून प्रश्न सोडवला जाऊ शकतो, अशी सावध भूमिका चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी घेतली आहे.
अमेरिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे, असे शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. दुसरीकडे अमेरिकेला जगभरातील जवळपास 15 देशांनी अतिरिक्त आयात शुल्कप्रकरणी कराराबाबत प्रस्ताव मिळाल्याची माहिती व्हाईट हाऊसचे मुख्य आर्थिक सल्लागार केविन हॅसेट यांनी दिली आहे. विविध देशांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर विविध देशांवर 90 दिवसांसाठी आयात शुल्क स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हॅसेट म्हणाले. काही आठवड्यांत जगभरातील नेते व्हाईट हाऊसमध्ये येतील, अशी अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.
हिंदुस्थानात टीव्ही, फ्रीज स्वस्त होणार
अमेरिकेने तब्बल 125 टक्के आयात शुल्क लादताच चीनने हिंदुस्थानला गोंजारायला सुरुवात केली आहे. चिनी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट कंपन्यांचे हिंदुस्थानी कंपन्यांनी पार्ट घेतले तर लगेचच 5 टक्के सवलत देऊ केली आहे. त्यामुळे येत्या काळात हिंदुस्थानात टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात. अमेरिकेत चीनमधून येणाऱ्या वस्तू महागणार आहेत, किंमत दुप्पट होणार आहे. त्यामुळे मागणी कमी होणार आहे. परिणामी, चिनी कंपोनंट बनविणाऱ्या कंपन्यांची झोप उडाली आहे.
जिनपिंग स्मार्ट व्यक्ती -डोनाल्ड ट्रम्प
जिनपिंग यांच्याकडून एका चांगल्या द्विपक्षीय कराराची अजूनही अपेक्षा असल्याचे ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेवरून समोर आले आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांची प्रशंसा केली. जगातील सर्वात स्मार्ट लोकांपैकी जिनपिंग एक आहेत. आम्ही एक चांगला करार करू असे त्यांनी म्हटले आहे. एक वेळ अशी येईल की चीनकडून कॉल येईल आणि सर्व काही वेगाने पुढे सरकेल असे ट्रम्प म्हणाले.
हिंदुस्थानवरील 26 टक्के कर 90 दिवसांसाठी स्थगित
हिंदुस्थानवर 26 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा घेतलेला निर्णय अमेरिकेने 90 दिवसांसाठी म्हणजेच 9 जुलैपर्यंत स्थगित केला आहे. व्हाईट हाऊसने याबाबतचे कार्यकारी आदेश दिले. 2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी अमेरिकेला निर्यात करणाऱ्या वस्तूंसाठी 60 हून अधिक देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लादले होते. या आयात शुल्कामुळे हिंदुस्थानातील विविध उत्पादनांची विक्री संकटात होती.
युरोपियन महासंघाकडूनही आयात शुल्काला स्थगिती
अमेरिकेवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याच्या निर्णयाला 90 दिवसांसाठी स्थगिती देण्यात आल्याची माहिती युरोपियन महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी केली आहे. ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर युरोपियन महासंघानेही आयात शुल्काला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.