
लाल समुद्रातील जहाजावर झालेल्या हल्ल्याला अमेरिकेने शनिवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांवर लष्करी कारवाई करण्यात आली. लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, लाल समुद्रातील जहाजांवर यापुढे हल्ला केला, तर तुमची अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणनेही हुथी बंडखोरांना पाठीशी घालू नये, असेही ट्रम्प यांनी बजावले आहे. इराणने जर अमेरिकेच्या विरोधात जाऊन कुठल्याही प्रकारची कारवाई केली तर अमेरिका याचे सडेतोड उत्तर देईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. जोपर्यंत हुथी बंडखोर लाल समुद्रातील जहाजांवरील हल्ले बंद करत नाहीत तोपर्यंत त्यांच्याविरोधात जोरदार हल्ले सुरूच राहणार असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘टथ’ या सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला असून आमचे शूर सैनिक अमेरिकेच्या शिपिंग, हवाई दल आणि नौदलाच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी हवाई हल्ले करत असल्याचे म्हटले आहे.
जहाजांची आवक-जावक सुरक्षित राहण्यासाठी कारवाई
लाल समुद्रात जहाजांची आवक-जावक सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून हुथी बंडखोरांच्या नेत्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी हल्ले करण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले. जगातील कोणतीही दहशतवादी संघटना अमेरिकेच्या वाणिज्य आणि नौदलाच्या जहाजांचा जलमार्ग अडवू शकत नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्याला आमच्याकडूनही प्रत्युत्तर दिले जाईल, असे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हुथी बंडखोरांनी निवेदन जारी करत म्हटले आहे. आमचे येमेनी सशस्त्र दलाचे सैनिक या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहेत, असे ‘अल-मसिराह’ वाहिनीवर बंडखोरांच्या राजकीय प्रवक्त्याने प्रतिक्रिया देताना सांगितले.
येमेनच्या अनेक भागांवर हुथींचा कब्जा
इराण समर्थक असलेल्या हुथी बंडखोरांनी दशकभरापासून येमेनच्या अनेक भागांवर ताबा मिळविला असून ते इस्रायल आणि अमेरिकेचा विरोध करतात. इस्रायलने गाझात हल्ला केल्यानंतर हुथी बंडखोरांनी लाल समुद्र आणि एडनच्या आखातात अनेक जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या पार्श्वभूमीवर इराणने हुथी बंडखोरांना पाठिंबा देणे तत्काळ थांबवावे अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.