
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ अस्त्र उगारून हिंदुस्थानसह जगभरातील सर्व देशांवर सरसकट 10 टक्के आयात शुल्क लागू केले आहे. तर काही निवडक देशांवर परस्पर शुल्क लागू करण्यात आले. त्यानुसार हिंदुस्थानवर 27 टक्के कर लागू करण्यात आला असल्याची पुष्टी व्हाईट हाऊसने केली. हिंदुस्थान आमच्यावर 52 टक्के व्यापार कर आकारतो, मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही जवळपास शून्य कर आकारत आलो, असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.
नवीन कर धोरणाचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की, या धोरणाला समन्यायी व्यापार असेच मी म्हणेन. हे पूर्णपणे जशास तसे कर नाहीत. आम्ही त्यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या कराचे दर फक्त निम्मे केले आहेत. जर कोणाला याबाबत तक्रार असेल तर त्यांनी त्यांची उत्पादने थेट अमेरिकेत तयार करावीत, असे ट्रम्प म्हणाले.
9 एप्रिलपासून अंमलबजावणी
9 एप्रिलपासून अमेरिका नवीन कर लादणार असून नरेंद्र मोदी यांना जवळचा मित्र असा उल्लेख करत ट्रम्प यांनी निशाणा साधला. अमेरिकेने अनेक सवलती दिल्या, पण हिंदुस्थान आमच्या वस्तूंवर अवाजवी शुल्क लावतो, असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेच्या निर्णयामुळे हिंदुस्थानातील अनेक उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
इतर देशांपेक्षा जास्त कर
अमेरिकन बाजारपेठेत हिंदुस्थानला चीन आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडून मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. मात्र, या दोन देशांच्या तुलनेत हिंदुस्थानवर कमी कर लागू करण्यात आला आहे. चीनवर 34 टक्के आणि व्हिएतनामवर 46 टक्के इतका व्यापार कर लागू करण्यात आला आहे. परंतु, इतर आशियाई देशांपेक्षा हिंदुस्थानवर लागू केलेला व्यापार कर जास्त आहे. तसेच थायलंडवर 36 टक्के, इंडोनेशियावर 32 टक्के, जपानवर 24 टक्के, दक्षिण कोरियावर 25 टक्के, मलेशियावर 24 टक्के, युरोपियन युनियनवर 20 टक्के आणि ब्रिटनवर 32 टक्के व्यापार कर अर्थात रेसिप्रोकल टेरिफ लागू करण्यात आला आहे.