इराणमधील बंदरात झालेल्या स्फोटात 25 ठार, 800 जखमी

इराणच्या दक्षिणेकडे असलेल्या शाहीद राजाई बंदरात झालेल्या स्फोटातील मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे, तर 800 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट क्षेपणास्त्र बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांशी संबंधित असल्याची माहिती आहे. स्फोटानंतर बंदरात लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टरने पाण्याचा मारा करण्यात आला.

शनिवारी सकाळी शाहीद राजाई बंदरातील सिना कंटेनर यार्डमध्ये हा स्पह्ट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भयंकर होती की, त्याचे धक्के 50 किमी अंतरापर्यंत जाणवले. बंदरापासून 26 किमी अंतरावर असलेल्या केश्म बेटावरही स्फोटाचा आवाज ऐकू आला. जवळच्या इमारतींच्या काचा फुटल्या, एक इमारत जमीनदोस्त झाली आणि अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. रविवारी तेथील शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्यात आली.