आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवीन वर्षाच्या मुहूर्तावर क्रिकेटच्या नियमात काही मोठे बदल केले आहेत. खरं तर गेल्या महिन्यातच क्रिकेटच्या नियमांमध्ये हे बदल केले होते, पण त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. त्यामुळे हे नवीन नियम वापरण्याची वेळ आल्यानंतर क्रिकेटपटूंची मात्र मैदानावर चांगलीच गोची झाली.
‘आयसीसी’चे हे सर्व नवीन नियम गतवर्षी 12 डिसेंबरपासूनच लागू झाले आहेत, मात्र हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यात या नवीन नियमांमुळे क्रिकेटपटूंचा गोंधळ उडालेला बघायला मिळाला. या नियमांमधील बदलांबद्दल बऱयाच काळापासून अनेक आजी-माजी खेळाडू बोलत होते. त्यानंतर आता आयसीसीने ते बदल लागू केले आहेत.
स्टंपिंग अपीला यापुढे कॉट बिहाइंड तपासले जाणार नाही
हा एक असा नियम होता, ज्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱया संघाला अनेकदा डीआरएस वाचवण्याच्या प्रयत्नात सामन्यादरम्यान त्याचा फायदा घेतला. याआधीच्या नियमात एखाद्या संघाने क्षेत्ररक्षण करताना फलंदाजाविरुद्ध स्टंपिंगसाठी अपील केले तर प्रकरण तिसर्या पंचाकडे जायचे. त्यावेळी स्टंपिंगव्यतिरिक्त कॉट बिहाइंडदेखील तपासले जात होते. यावर अनेक वेळा खेळाडूंनी याआधी आक्षेपही घेतला होता, मात्र आता ‘आयसीसी’च्या नवीन नियमानुसार जर कोणत्याही संघाने स्टंपिंगबाबत अपील केले तर ते थर्ड अंपायरकडे जाईल तेव्हा ते साइड-ऑन रिप्ले पाहूनच ते तपासतील. याशिवाय क्षेत्ररक्षण करणाऱया संघाला झेलबाद होण्याचे अपील करायची असल्यास त्यांना पुन्हा डीआरएस घ्यावे लागेल.
कन्कशन रिप्लेसमेंट नियमात बदल
‘आयसीसी’ने कन्कशन रिप्लेसमेंट नियमांमध्येही अधिक स्पष्टता आणली आहे. दुखापत झालेल्या खेळाडूला गोलंदाजी करण्यापासून निलंबित केले असल्यास त्याच्या बदली खेळाडूला गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याव्यतिरिक्त आयसीसीने मैदानावरील दुखापतींचे मूल्यांकन आणि उपचारासाठी दिलेला वेळ चार मिनिटांपर्यंत मर्यादित केला आहे.