महायुती सरकारमध्ये धुसफुस, अस्वस्थ शिंदे अमित शहांना पुण्यात पहाटे 4 वाजता भेटले

महायुती सरकारमध्ये शिंदे गटाच्या मनासारखे काहीच घडत नसल्याने धुसफुस सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या काळातील निर्णयांचा फेरविचार करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पुणे दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी पहाटे चार वाजता कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलमध्ये भेट घेतल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. मंत्रीपदे, पालकमंत्रीपदे, खासगी सचिवांच्या नियुक्त्या, महत्त्वाचे निर्णय यात फडणवीसांनी डावलल्याने मिंधे गट हैराण झाला आहे. आता फडणवीसांवर कुरघोडी करण्यासाठी समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला. त्यानंतर फडणवीस यांनीही काहीशी कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पहाटे केंद्रीय गृहमंत्री शहा यांची पुण्यात भेट घेतली. एवढय़ा सकाळी शिंदे शहा यांच्या भेटीसाठी का गेले?, भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.