
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत तीन जागा भाजपच्या वाटय़ाला आल्या. या जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. दादाराव केचे, अमर राजूरकर आणि माधव भंडारी यांच्या नावांची चर्चा होती, मात्र ऐनवेळी राजूरकर आणि भंडारी यांना डावलून फडणवीस समर्थकांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आल्याने भाजपमध्ये आता धुसफुस सुरू झाली आहे.
भाजपकडून विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या 20 जणांची यादी प्रादेशिक समतोल साधत तयार करण्यात आली होती. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काहीजणांची नावे होती, मात्र उमेदवाराची नावे अंतिम करताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विदर्भाला झुकते माप देत संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली. संदीप जोशी यांना नागपूर पदवीधरमधून याआधी उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला, तर फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांच्यासाठी दादाराव केचे यांचे विधानसभेचे तिकीट कापण्यात आले. त्याबदल्यात त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याने फडणवीस विरोधी गटात कमालीची अस्वस्थता आहे.
निष्ठावंतांच्या नाराजीमुळे राजूरकरांचा पत्ता कट
अमर राजूरकर हे अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये आले. त्यांच्या उमेदवारीसाठी चव्हाण यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती, मात्र नांदेड जिह्यातील भाजपच्या निष्ठावंत गटाने राजूरकर यांच्या नावाला विरोध केला. अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या कार्यकत्यांना संधी देण्यात यावी असा आग्रह जिह्यातील नेत्यांनी धरला होता. त्यातच अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यावर लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये चिखलीकर यांचा झालेला पराभव, त्यापाठोपाठ लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे अशोक चव्हाण समर्थक राजूरकर यांना संधी नाकारून भाजप निष्ठावंत संजय केनेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
भंडारी यांना थांबण्याचा सल्ला
विधान परिषद असो की राज्यसभा, माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा दरवेळी उमेदवार म्हणून असते, पण अंतिम यादीत त्यांचे नाव कधीच येत नाही. भंडारी यांना याखेपेस उमेदवारी मिळेल असा शब्द देण्यात आला होता. दिल्लीला पाठविलेल्या यादीत त्यांचे नावदेखील होते, मात्र फडणवीस समर्थक जोशी यांच्यासाठी भंडारी यांना थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याची चर्चा आहे.