
पहलगाम हल्ल्याची घटना ताजी असतानाच गुप्तचर यंत्रणांनी जम्मू आणि कश्मीरमध्ये अलर्ट जारी केला आहे. कश्मीरमध्ये पुन्हा मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर लष्कर-ए-तैयबाच्या धोकादायक मॉड्यूलबद्दल सतर्क राहण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. मिळालेल्या अलर्टनुसार, हे मॉड्यूल कश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
दहशतवादी टार्गेट किलिंगसह मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारी करत आहेत. दक्षिण कश्मीरमधील पर्यटन स्थळे हे या मॉड्यूलचे लक्ष्य आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता पर्यटन स्थळांची सुरक्षा वाढवण्यास आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे. कश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कर आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अनिवासी नागरिक, अल्पसंख्याक काश्मिरी पंडित आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना किंवा पायाभूत सुविधांना लक्ष्य करून भीषण हल्ले करण्याची योजना आखत आहेत.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि कश्मीरमधील दोन प्रमुख रुग्णालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले. शुक्रवारी सायंकाळी जम्मूच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाने (जीएमसी) अॅडवायजरी जारी करत कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
तसेच स्टोअर अधिकाऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व आवश्यक साहित्य, आपत्कालीन औषधे आणि महत्त्वाची उपकरणे तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना अनावश्यक रजा न घेण्याचे आवाहनही अॅडवायजरीत करण्यात आले आहे.