हिंदुस्थानी नागरिकांनो, तत्काळ लेबनॉन सोडा, बैरूतमधील दूतावासाच्या सूचना

इस्रायली सैन्याने काही दिवसांपूर्वी लेबनॉनमध्ये 400 हून अधिक क्षेपणास्र डागल्यामुळे तब्बल 700 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लेबनॉननेही इस्रायलवर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे युद्ध आणखी चिघळणार असून हिंदुस्थानी नागरिकांनी तत्काळ लेबनॉन सोडावे, तसेच हिंदुस्थानातून लेबनॉनसाठी प्रवास करू नये, अशा सूचना लेबनॉनची राजधानी बैरूतमधील हिंदुस्थानी दूतावासाकडून करण्यात आल्या आहेत. दरम्यान, इस्रायली लष्कर लेबनॉनमध्ये सैन्य घुसवून मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत मध्य पूर्वेत आणखी एका युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधा नष्ट करून जमिनीवर घुसखोरीचा मार्ग शोधण्यासाठी लेबनॉनमध्ये हवाई हल्ले करण्यात येत असल्याचे इस्रायलचे लष्करप्रमुख हरजाई हलेवी यांनी सांगितले. इस्रायली सैन्याने बुधवारी रात्री उशिरा हिजबुल्लाहच्या 75 स्थानांवर हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यात बुधवारी किमान 72 जणांचा मृत्यू झाला. इस्रायली सैन्य हिजबुल्लाहच्या हद्दीत प्रवेश करून त्यांच्या लष्करी चौक्या उद्ध्वस्त करतील, असेही हलेवी यांनी म्हटले आहे.

पुतीन यांची अणुयुद्धाची धमकी

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांना आण्विक अस्त्र वापरण्याची धमकी दिली. बुधवारी पुतीन यांनी मॉस्कोमध्ये सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी अण्वस्त्रांच्या वापरासंबंधातील अटी आणि शर्ती बदलणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अणुयुद्धाचा भडका उडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून क्रूझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा झाला आहे. याचा वापर करून रशियावर दुरूनही क्षेपणास्त्र डागता येणार आहे. याचा आढावा घेतल्यानंतर पुतीन यांनी तातडीची बैठक घेतली. अण्वस्त्र नसलेल्या देशाने जर अण्वस्त्रधारी देशांच्या मदतीने रशियाच्या भूमीवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यास तो अण्वस्त्र हल्ला समजला जाईल आणि त्याला अण्वस्त्रांनीच उत्तर दिले जाईल, अशी धमकीच पुतीन यांनी युक्रेनसह पाश्चिमात्य देशांना दिली आहे.

लेबॉनमधून दोन लाख लोक विस्थापित

हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्यापासून परिस्थिती बिघडली. आता हल्ल्यांचे प्रमाण वाढल्यामुळे लेबनॉन आणि इस्रायलमधील युद्ध चिघळण्याच्या स्थितीत आहे. येथील सर्व परिस्थितीमुळे आतापर्यंत लेबनॉनमधील जवळपास दोन लाख लोक विस्थापित झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे.

इस्रायलने युद्धबंदीची मागणी फेटाळली

लेबनॉनवरील हवाई हल्ले थांबवून 21 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करावी, असा प्रस्ताव अमेरिका आणि फ्रान्स यांनी इस्रायलपुढे ठेवला होता, परंतु इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. हिजबुल्लाहशी आम्ही सर्वशक्तिनीशी लढत राहू, असे इस्रायलचे परराष्ट्र मंत्री पॅटझ यांनी ‘एक्स’वरून म्हटले आहे.