Beed News – बीड शिक्षक आत्महत्याप्रकरणी संस्थाचालकांची चौकशी होणार

बीड जिह्यातील केज तालुक्यातील आश्रमशाळेमधील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी काही महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्याप्रकरणी संस्थाचालकांची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई करू, अशी माहिती गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.

बीडमधील वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांसमोर आव्हान असताना दोन दिवसांपूर्वी स्वराजनगर भागात आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी पगार न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी फेसबुकवर तीन वर्षांच्या लहान मुलीला त्यांनी भावनिक पोस्ट लिहिली. विक्रम मुंडे, विजय मुंडे, अतुल मुंडे या संस्थाचालकांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा उल्लेख त्यात असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.

आत्महत्या करायला भाग पाडले

धनंजय नागरगोजे यांना मागील काही महिन्यांपासून पगार मिळत नव्हता. उलट संस्थाचालकांनी त्यांना फाशी घे आणि मोकळा हो म्हणजे तुझ्या जागी मी दुसऱ्या कोणाला तरी नियुक्त करेन, असा सल्ला दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या शिक्षकाने आत्महत्या केली. त्याला तीन वर्षांची मुलगी आहे, परंतु आत्महत्या केल्यानंतर संस्थाचालकांवर कोणताही गुन्हा का दाखल केला गेला नाही, असा सवाल करत शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी स्युमोटो गुन्हा दाखल करून घ्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली. शिवसेना सदस्य अनिल परब यांनीही संबंधित संस्थाचालकांवर तत्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.

सर्व आश्रमशाळांचे सर्वेक्षण करा!

राज्यभरात आश्रमशाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांकडून सातत्याने शिक्षकांचे वेतन थकवले जात आहे. अशा शाळांचे सर्वेक्षण करून संस्थांचा आढावा घ्यावा. दोषी आढळणाऱ्या संस्थाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी विरोधकांनी परिषदेत केली. दरम्यान, याबाबत सरकार स्तरावर लवकरच निर्णय घेऊन कारवाई करेल, असे आश्वासन भोयर यांनी दिले.