
कल्याण एपीएमसीचा अक्षरशः ‘बाजार’ मांडला आहे. दोनवेळा संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे स्वतःच प्रशासक म्हणून एपीएमसीच्या खुर्चीवर बसले आहेत. मुळात प्रारूप मतदार यादी तयार करून कल्याण बाजार समितीची निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने तीन महिन्यांपूर्वीच दिले आहेत. त्यानुसार बाजार समितीने प्रारूप मतदार यादी तयार करून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक यांना सादरही केली. मात्र अंतिम मतदार यादी निबंधकांनी जाहीर केली नाही. त्यामुळे प्रशासक म्हणून बाजार समितीचा कारभार हातात घेण्यासाठीच पुन्हा एकदा निवडणूक पुढे ढकलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप सेवा संस्था, शेतकरी, व्यापारी व माथाडी यांनी केला आहे.
कल्याण बाजार समितीची निवडणूक 17 मार्च 2019 रोजी झाली होती. संचालक मंडळाचा कार्यकाळ मार्च 2024 मध्ये संपल्यानंतर दोनदा मुदतवाढ दिली. वाढीव मुदतीचा कालावधी 21 एप्रिल 2025 रोजी संपुष्टात येणार असल्याने उपनिबंधक किशोर मांडे यांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 25 मार्च रोजी अंतरिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने 10 एप्रिल रोजी प्रारूप मतदार याद्या सादर केल्या. २१ एप्रिलपूर्वी अंतिम मतदार यादी तयार करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे अपेक्षित असताना उपनिबंधकांनी तांत्रिक कारणे देत मतदार यादीच प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे संचालक मंडळाची वाढीव मुदत संपताच आज त्यांनी प्रशासक म्हणूच स्वतःच स्वतःची आर्डर काढली.
किशोर मांडे यांना आपल्याच म्हणण्याचा विसर
समितीच्या मतदार याद्यांमध्ये त्रुटी आढळल्याने त्या पुन्हा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोन तीन दिवसांत अंतिम मतदार याद्या तयार होतील. त्यामुळे 15 दिवसांत कल्याण बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल असे किशोर मांडे यांनी 1 एप्रिल रोजी सांगितले होते. मात्र त्यांना आपल्याच म्हणण्याचा विसर पडला आणि निवडणूक घेण्याऐवजी ते प्रशासक म्हणून खुर्चीवर बसले.