गावकऱ्यांनी केला शिक्षणाला विरोध, पण हिंमत सोडली नाही; ‘आयएएस’ प्रिया राणीची प्रेरणादायी गोष्ट

प्रिया राणीने अनेक अडचणींवर मात करत घवघवीत यश मिळवले. प्रियाने यूपीएससी परीक्षेत 69 वा रँक मिळवला. खेड्यात वाढलेल्या प्रियाला तिच्या शिक्षणासाठी गावातील लोकांनी खूप विरोध केला, पण तिने हिंमत हारली नाही आणि ती आपल्या आई-वडिलांसोबत शहरात राहायला आली. आज आयएएस झाल्यावर विरोध करणारे लोक तिचे कौतुक करत आहेत आणि तिचे यश साजरे करत आहेत. प्रियाची गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे.

जेव्हा गावातले सगळे प्रियाच्या शिक्षणाला विरोध करत होते, तेव्हा तिच्या आजोबांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला आणि तिला मदत केली. तिची जिद्द आणि मेहनतीमुळे प्रिया आज आयएएस अधिकारी बनली आहे. प्रिया सांगते की, सुमारे 20 वर्षांपूर्वी तिचे आजोबा तिला चांगल्या शिक्षणासाठी पाटण्याला घेऊन गेले.  

स्वप्न पूर्ण झाले

प्रियाने पाटणा येथे भाड्याच्या घरात राहून आपले शिक्षण पूर्ण केले. बीआयटी मेसरा येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर प्रिया राणीने यूपीएससीची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात तिला संरक्षण सेवेत नोकरी मिळाली, पण तिचं आयएएस होण्याचं स्वप्न अधुरेच राहिले. तिसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर चौथ्या प्रयत्नात तिने ध्येय गाठले.

नियमित अभ्यास आणि मेहनत हेच तिच्या यशाचे गमक असल्याचे प्रिया राणीने सांगितले. ती दररोज पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करायची. कोणत्याही अडचणीचा धैर्याने आणि समर्पित वृत्तीने कसा सामना केला जाऊ शकतो, हे तिने दाखवून दिलंय. ती सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहे.