भावाचा आजारपणात मृत्यू; बहीण मेहनतीने झाली डॉक्टर, रुबीची प्रेरणादायी गाथा

भावाचा आजारपणाने मृत्यू झाला. घरची परिस्थिती बेताची. अगदी स्वतःला टीबी होऊनही हार न मानता मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होणाऱ्या रुबी प्रजापतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. गुजरात येथील रुबी प्रजापती या मुलीने नीट-यूजी परीक्षेत 720 पैकी 635 गुण मिळवले. अनेक अडचणींना तोंड देत रुबीने हे यश मिळवले.

रुबी प्रजापतीचे वडील ऑटोरिक्षा चालवतात. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. 9 वर्षांपूर्वी तिच्या भावाचा आजारपणात मृत्यू झाला. त्याला बोलण्यातही अडचण येत होती. त्याच्या निधनानंतर रुबीने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला, पण तिची तब्येत तिला साथ देत नव्हती. रुबीला टीबी झाला. 2018 मध्ये ती पूर्ण बरी झाली. आजारपणाच्या अनुभवामुळे डॉक्टर बनण्याचा तिचा निर्धार पक्का झाला. तिच्या काकांनी तिला मदत केली. तिच्या आईनेही तिच्यावर विश्वास दाखवला.

लोकांच्या सेवेचा वसा

‘नीट’ कोचिंगचा खर्च काकांनी उचलला. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर तिची कामगिरी फारशी चांगली नव्हती. तरी तिने हार मानली नाही. अभ्यासाच्या पद्धतीत बदल केला. रुबीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. आधुनिक पद्धतीचा स्वीकार केला. ऑनलाइन साधनांचा वापर केला. ऑनलाइन कोचिंग व्हिडीओचा तिला फायदा झाला. तिच्या मेहनतीचे यश तिला मिळाले. आज रुबी दिल्लीतील व्हीएमएमसी आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत आहे. तिची कहाणी सोशल मीडियावरून शेअर करत आहे. अनेकांसाठी रुबीची कहाणी प्रेरणादायी ठरत आहे.