न्यूझीलंडला दुखापतीचा धक्का

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला लागलेले दुखापतींचे ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसेनाशी झालीत. जसप्रीत बुमरा, मिचेल स्टार्प, पॅट कमिन्ससारखे दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेला आधीच मुकले आहेत. आता त्यात न्यूझीलंडलासुद्धा मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज बेन सिअर्स हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असल्यामुळे न्यूझीलंडची डोकेदुखी वाढली आहे. कराची येथे संघाच्या पहिल्या सराव सत्रादरम्यान सिअर्सला डाव्या मांडीच्या स्नायूंमध्ये वेदना जाणवल्याची पुष्टी न्यूझीलंड क्रिकेटने केली होती. त्याला हॅमस्ट्रिंगची किरकोळ दुखापत झाली असून त्यासाठी किमान दोन आठवडे विश्रांती आवश्यक आहे. 2 मार्चला हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंडच्या शेवटच्या गट ‘अ’ सामन्यासाठी सिअर्स उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बेनच्या जागी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जेकब डफीला संघात स्थान देण्यात आले आहे.