लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो कामगार-कर्मचाऱयांच्या नोकरीचा वारसा हक्क अबाधित राहिल्याच्या पार्श्वभूमीवर कामगारांचा भव्य विजयी मेळावा भोईवाडा येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात पार पडला.
म्युनिसिपल मजदूर युनियनच्या वतीने आयोजित मेळाव्यात संबंधित खटला न्यायालयात प्रभावी व अभ्यासपूर्ण बाजू मांडून यश संपादन करणारे ज्येष्ठ विधितज्ञ, वकील आणि महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी फेडरेशनचे कामगार नेते यांचा गौरव व सन्मान करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे कार्याध्यक्ष व म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, स्वागताध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस वामन कविस्कर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई यांनी केली. मेळाव्यामध्ये अॅड. हरीश बळी आणि अॅड. बळीराम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.