उल्हासनगर पालिकेच्या शाळांना मिळणार आदर्श लूक

पुणे शहरात इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळख निर्माण करणारे विकास ढाकणे यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त पदाचा पदभार हाती घेतल्यावर शाळांमध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ढाकणे यांनी सर्व शाळांची पाहणी केल्यावर चार शाळांना आदर्श लूक देण्याचा आणि इंग्रजी व सीबीएससी बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू करण्याचा संकल्प केला आहे.

दिल्ली आणि महाराष्ट्रातील काही शहरामधील महापालिकेच्या शाळांनी कात टाकल्याने गोरगरीब पालकांचे मतपरिवर्तन होऊ लागले आहे. त्यांनी मुलांना खासगी शाळांऐवजी पालिकेच्या शाळेमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर आयुक्त विकास ढाकणे यांनी शाळांचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुशंगाने विकास ढाकणे यांनी शिक्षण अधिकारी दीपक धनगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता तरुण शेवकानी यांच्यासोबत महापालिका क्षेत्रामधील महापालिका शाळा क्र.5,13,14,19 आणि 29 या शाळांची पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान ढाकणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेमधील शैक्षणिक गुणवत्तेचा व उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेतला आहे.

आयुक्त विकास ढाकणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे लवकरच चार शाळांना आदर्श लूक देण्याच्या आणि इंग्रजी व सीबीएससी बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू करण्याच्या कामास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती उपमुख्य लेखाधिकारी नीलम कदम यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार

महापालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव देण्यात येणार आहे. क्रीडागुणांना प्राधान्य देण्यासाठी मैदाने तयार केली जाणार आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी बोर्ड आणि इंग्रजी माध्यम अशा दोन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा खासगीऐवजी महापालिकेच्या शाळांकडे नक्कीच वळणार असा विश्वास विकास ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.