इन्फोसिसचा 400 कर्मचाऱ्यांना नारळ, अनेकजण बेशुद्ध पडले; कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप

इन्फोसिस या देशातील आघाडीच्या आयटी कंपनीने तब्बल 400 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱयांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. हे प्रशिक्षणार्थी कर्मचारी सलग तीन प्रयत्नातही मूल्यांकन चाचणी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, असे कारण कंपनीने दिले आहे. विशेष म्हणजे कंपनीने अडीच वर्षांपूर्वी एक हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांची नियुक्ती केली. दरम्यान, अनेक कर्मचारी कंपनीचा निर्णय ऐकून बेशुद्ध पडले.

नियुक्तीपत्र पाठवूनही अडीच वर्षे या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करण्यामागे काही आर्थिक कारणे होती, असे इन्पहसिसने म्हटले आहे. इन्फोसिसच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी मात्र प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मूल्यांकन चाचण्या खूप कठीण होत्या आणि आम्हाला नापास होण्यास भाग पाडल्यामुळे आता आम्हाला आमचे भविष्य अंधःकारमय दिसत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान, प्रशिक्षणार्थी कर्मचाऱयांनी मोबाईल फोन आणू नयेत यासाठी कंपनीने बाऊन्सर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.

कंपनीची सायलेंट ले ऑफ प्रक्रिया

कंपनीने अलीकडेच सायलंट ले ऑफ प्रक्रिया राबवली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकण्याऐवजी स्वेच्छेने राजीनामा देण्यास सांगून त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत. दरम्यान, 2024 मध्ये विविध कॅम्पसमधील शेकडो कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.