आयटी सेवा पुरवणारी कंपनी इन्फोसिसने चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या दुसऱ्या तिमाहीच्या काळात चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 90 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांची चांदी झाली असून पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली आहे. इन्फोसिसने या निर्णयाबाबत त्यांच्या कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे कळवले आहे.
ज्या कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे, अशा कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ दिला जाणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. हा बोनस डिलिवरी आणि विक्री क्षेत्रातील मध्यम आणि ज्युनिअर लेवलच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. इन्फोसिसच्या एकूण 3.15 लाख कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना याचा लाभ मिळणार आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना पाङ्गवलेल्या ई-मेलमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पगारासह बोनस दिला जाईल असे म्हटले आहे.
कंपनीने मानले आभार
कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे कंपनीचे बाजारमूल्य वाढले आहे. कर्मचाऱ्यांच्या चांगल्या क्षमतेमुळे ग्राहकांना चांगल्या सोयी देण्यात मदत होत आहे. सहकार्यासाठी कर्मचाऱ्यांचे धन्यवाद, असे इन्फोसिसने आपल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. कंपनीची सप्टेंबरच्या तिमाहीतील कमाई 4.7 टक्क्यांनी वाढून 65.6 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एकूण कमाई 5.1 टक्क्यांनी वाढून 40986 कोटींवर पोहोचली आहे.