शुभमंगल ‘सावधान’! महागाईमुळे लग्नावर होणार दुप्पट खर्च

प्रातिनिधिक फोटो

लग्नसराई तोंडावर आली असतानाच नवरा-नवरीच्या बस्त्यापासून ते पाहुणे मंडळीच्या जेवणापर्यंतच्या खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने लग्नाचा खर्च दुपटीने वाढला आहे. मुंबईसारख्या शहरात साध्यातले साधे लग्न करण्यासाठीसुद्धा 6 लाख ते 8 लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे वधूच्या पित्याचे अक्षरशः पंबरडे मोडले जात आहे. वेडिंगवायरने केलेल्या ऑनलाईन सर्व्हेतील एका नव्या अहवालानुसार, 2023 मध्ये हिंदुस्थानात एका लग्नाचा खर्च सरासरी 6 लाख रुपये होता. तर 2022 मध्ये हाच खर्च 4.7 लाख रुपये होता. परंतु 2025 या वर्षात लग्नावर करण्यात येणाऱया खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. यामुळे लग्न करणाऱयांचे अक्षरशः पंबरडे मोडले आहे. महागाई वाढल्यामुळे 40 टक्क्यांहून अधिक जोडप्यांना लग्नावर 7.5 लाखांहून अधिक खर्च करावे लागत आहेत. तर चांगले लग्न करण्याच्या नादात 31 टक्के लोकांना 10 लाखांपेक्षा अधिक खर्च करावा लागत आहे.

 पाहुण्यांच्या स्वागतात कोणतीच कमतरता राहू नये, यासाठी वधू आणि वरांकडील मंडळी विशेष लक्ष देत आहे. पाहुण्यांचे जेवण, लग्नस्थळी आल्यानंतर त्यांचे मनोरंजन व्हावे, यावर विशेष लक्ष दिले जात आहे. डिजिटलचा जमाना असल्याने लग्नासाठी विशेष प्लानिंग केली जात आहे. 79 टक्के लोक आता व्हॉट्सअॅप आणि वेडिंग वेबसाईट्सद्वारे लग्नाचे निमंत्रण पाठवत आहेत. घरी जाऊन लग्नाचे निमंत्रण देण्याकडे लोकांनी बऱयापैकी पाठ फिरवली आहे. देशात 35 टक्के लोक हे हळद ते लग्न असे तीन दिवस खास कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.

 ऐन लग्नसराईत सोने अवाच्या सवा वाढल्याने अनेकांचे बजेट कोलमडले आहे. सोन्यांनी नक्वदी पार केली आहे. त्यामुळे वर आणि वधू यांना चांगलाच फटका बसला आहे. लग्नात नवरीसाठी लागणारे गळ्यातील मंगळसूत्र, कानातील फुले, नाकातील नथ खरेदी करायची म्हटले तर यासाठी लाखो रूपये मोजावे लागत आहेत. नवरदेवासाठी एका तोळ्याची चैन किंवा अंगठी खरेदी करायची असल्यास एक लाखांहून जास्त रक्कम मोजावी लागते.