महागाईच्या झळांनी सर्वसामान्य जनता होरपळत आहे. आता त्यात भाज्यांच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. फ्लॉवर, कोबी, मटार यासारख्या सर्वाधिक मागणी असणाऱ्या भाज्यांच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच पालेभाज्या आणि फळे यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे रोजचे जेवणे कसे बनवायचे असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे.
बाजारात मागणी जास्त असल्याने फ्लॉवर, कोबी, मटारच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. इतर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांमध्येही वाढ दिसून आली. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी राज्यासह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्याच्या परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची 12 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी चार टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून चार टेम्पो शेवगा, राजस्थानमधून 15 टेम्पो गाजर, कर्नाटकातून घेवडा पाच टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग शेंगा दोन टेम्पो, मध्य प्रदेशातून मटार 15 ट्रक, कर्नाटकातून पावटा तीन टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची पाच टेम्पो आवक झाली.
सातारी आले 700 गोणी, भेंडी सहा टेम्पो, गवार सहा टेम्पो, टोमॅटो 12 हजार क्रेट, हिरवी मिरची पाच टेम्पो, काकडी 10 टेम्पो, फ्लॉवर 10 टेम्पो, कोबी पाच टेम्पो, सिमला मिरची 10 टेम्पो, पावटा पाच टेम्पो, तांबडा भोपळा 12 टेम्पो, कांदा जुना आणि नवीन 100 ट्रक, इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची 70 टेम्पो आवक झाली.
पालेभाज्यांचे दरही वाढले
पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने शेपू, चुका, हरभरा गड्डीच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली. रविवारी कोथिंबिरीची तब्बल दीड लाख जुडी, तर मेथीची 70 हजार जुडी इतकी आवक झाली.
खरबूज, सीताफळांच्या भावात वाढ
फळबाजारात रविवारी खरबूज आणि सीताफळांच्या भावात वाढ झाली असून, लिंबांचे भाव कमी झाले. अननस, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कलिंगड, स्ट्रॉबेरी, पपई, चिक्कू, पेरू आणि बोरांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
झेंडूच्या भावात निम्म्याने घट
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत झेंडूच्या भावात निम्म्याने घट झाली. अन्य फुलांच्याही भावात काही प्रमाणात घट झाली असून, शेवंतीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.