नव्या वर्षात तरी महागाईच्या फेऱ्यातून सुटका होईल असे वाटत असतानाच आता सर्वसामान्यांच्या ताटातील भाज्याही गायब होण्याची चिन्हे आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला थंडीमुळे भाज्यांची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या किमतीवर झाला आहे. सामान्यांच्या ताटात दिसणाऱ्या फ्लॉवर, कोबी, वाटाणा, भेंडीने चांगलाच भाव खाल्ला असून त्यांच्या किमती 15-20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच इतरही भाज्यांचा दर वाढल्याने नव्या वर्षाची सुरुवात महागाईने होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे खायचे काय, असा प्रश्न उभा राहिला आहे.
मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत पुणे, नाशिक, नगर जिह्यातून मोठय़ा प्रमाणात भाजीपाला येतो. मात्र राज्यात थंडीचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या पुरवठय़ावर होऊ लागला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या भाज्यांच्या गाडय़ांचा आकडा घसरला आहे. त्यामुळे त्याचे पडसाद आता किरकोळ भाजी मार्केटमध्ये उमटू लागले आहेत. 25-30 रुपये किलो मिळणारा फ्लॉवर कोबी आता 40 रुपयांवर गेला आहे. वाटाणा 50 रुपयांवर तर भेंडी 60-70 रुपयांवर गेली आहे. दहा रुपये पावने मिळणाऱ्या या भाज्यांसाठी आता बारा-पंधरा रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे नव्या वर्षात गृहिणींचे बजेट हळूहळू कोसळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
आठवडाभरात आणखी भाव वाढणार
राज्याच्या ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर होतो. त्यामुळे पुढील आठवडय़ात भाज्यांची आवक आणखी कमी होणार असल्याने भाव वाढणार असल्याची भीती सूर्यकांत पंदरपळे या भाजी विक्रेत्याने व्यक्त केली.
मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यातूनही हिरवी कोबी, शेवगा, घेवडा, पावटय़ाची मोठी आवक होती, मात्र तीही आता काही प्रमाणात कमी झाली आहे.
किरकोळ बाजारातील भाज्यांचा प्रतिकिलोचा दर
- मिरची : 80 रु.
- वाटाणा : 50 रु.
- भेंडी : 60 रु.
- वांगी : 60 रु.
- टोमॅटो : 50-60 रु.
- दुधी : 60 रु.
- कोबी : 40 रु.
- फ्लॉवर : 40 रु.
- चवळी : 60 रु.
- बटाटा : 30-35 रु.
मेथी, पालक, चुका, हरभऱ्याची गड्डी 20 रुपयांवर
पालेभाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. दहा-पंधरा रुपयांना मिळणारी मेथी, पालक, चुका, शेपू, हरभऱ्याच्या एका गड्डीचा दर आता 20 रुपयांवर गेला आहे, तर कोथींबिरीच्या गड्डीसाठी 30-40 रुपये मोजावे लागत आहेत.