महागाईची निवडणुकीलाही झळ; प्रचारसाहित्य 25 टक्क्यांनी महागले!

महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडून गेले आहे. याच महागाईची विधानसभा निवडणुकीलाही झळ बसली आहे. निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार प्रचाराची पूर्वतयारी करीत असताना त्यांना प्रचार साहित्य खरेदीमध्ये वाढीव किंमत मोजावी लागत आहे. विघटन न होणाऱ्या वस्तूंवरील सीमाशुल्क दरात 25 टक्के वाढ झाली आहे. परिणामी प्रचार साहित्यदेखील 25 टक्क्यांनी महागले आहे. यातील 15 टक्के वाढ लोकसभा निवडणुकीनंतर झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या साहित्याबरोबर अनेक दुकाने प्रचार साहित्यांनी सजली आहेत. यात फलक, फ्लेक्स, झेंडे, पताका, पक्षाचे दुपट्टे आदी साहित्यांचा समावेश आहे. प्रचारातील फलकांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टार मिलिया कपडय़ाचा प्रकार कोरियातून आयात केला जातो. त्यात 180, 220, 340 जाडी (जीएसएम) प्रकार असतात. प्रचाराच्या साहित्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मूळ वस्तूंवरील सीमाशुल्क दरात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचा परिणाम प्रचार साहित्यांच्या दरावर झाला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी 10 बाय 10 च्या फलकाचा दर 1100 ते 1200 रुपयांच्या आसपास होता. याच आकारातील फलकासाठी आता दीड हजारावर किंमत मोजावी लागत आहे. 

प्रचारात फडकवण्यात येणाऱ्या झेंडय़ांच्या कापडांचेही दर वाढले आहेत. यामुळे पक्षांचे झेंडे, उपरणे यांचाही भाव वधारला आहे.