जम्मू कश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, एक जवान जखमी

जम्मू कश्मीर गेल्या महिनाभरापासून दहशतवादी कारवायांनी धुमसत आहे. एका पाठोपाठ एक कारवाया होत असल्याने सध्या जम्मू काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक होत चालल्याचे बोलले जातेय. मंगळवारी जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बाटल सेक्टरमधील सीमेवरून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव जवानांनी उधळून लावला. मात्र यावेळी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. लष्कराच्या व्हाईट नाईट क़ॉर्प्स बटालियनने याबाबत ट्विट केले आहे.

सोमवारी सकाळी राजौरी येथील घोंडा गावातील ग्रामसंरक्षक परशोत्तम कुमार यांच्या घरावर दहशवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर या भागात शोधमोहिम सुरू करण्यात आली होती. या दरम्यान एका दहशतवाद्याचा 63 आरआर आर्मी कॅम्पच्या तुकडीने खात्मा केला. या हल्ल्यात एक जवान आणि परशोत्तम कुमार यांचे काका जखमी झाले असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याआधी 16 जुलैला जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित कश्मीर टायगर्स या ग्रृपने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.