
देहू आळंदी परिसर विकास समितीच्या माध्यमातून विकसित झालेल्या दगडी घाटाचे जेसीबीच्या मदतीने ब्रेकर लावून ड्रेनेज लाइनसाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इंद्रायणीचा घाट विद्रूप बनला आहे. आळंदी शहरातील सांडपाणी बंदिस्त नाल्यातून नेण्यासाठी सुरू असलेल्या या कामामुळे पावसाळ्यात महापुराच्या स्थितीमध्ये घाटास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या रक्षा विसर्जन स्तंभास धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने हे काम थांबवून योग्य नियोजन करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी केली आहे.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्च करून घाटाचे काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध दगडी घाट बांधण्यात आला आहे. या घाटाच्या खालून सांडपाणी वाहून जाण्याकरिता स्वतंत्र भूमिगत लाइनचे नदीपात्राच्या कडेने बांधकाम करण्यात आले आहे. असे असताना संस्था किंवा संस्थेचे अधिकारी यांच्याशी चर्चा न करता रात्रीच्या वेळी या घाटाजवळ जेसीबीने तोडफोड केल्याने भाविक, नागरिकांसह विविध सेवाभावी संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आळंदी शहरातील सांडपाणी पुंडलिक मंदिरालगत उघड्यावर वाहते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ते बंदिस्त करण्याचे काम सुरू आहे. ही सांडपाणी वाहिनी पुढे एसटीपी प्रकल्पास जोडली जाणार आहे. त्यामुळे सांडपाणी नदीत मिसळणार नाही. त्यामुळे सांडपाणी वाहिनीचे काम झाल्यावर घाटाचे काम पूर्ववत नगरपरिषदेकडून केले जाईल, असे बांधकाम अभियंता सचिन गायकवाड यांनी सांगितले.
यासंदर्भात माईर्स एमआयटीचे संचालक डॉ. महेश थोरवे म्हणाले, संस्थेने ज्या पद्धतीने दगडी घाट बांधकाम केले आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात महापुराच्या स्थितीमध्ये घाटास धोका होऊ शकतो. यामुळे घाट खचून जीवितहानी होण्याची भीती आहे. तसेच या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे रक्षाविर्सजन स्तंभास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे हे खोदकाम थांबवून पर्यायी मार्ग काढावा.
केवळ विकासकामासाठी उपलब्ध निधी खर्ची टाकण्याचा घाट यातून सुरू असून, विकासाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी सुरू आहे. हे काम तत्काळ थांबविण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी राजेंद्र डुडी यांच्याकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे.