
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये टक्कल पडलेल्या डोक्यावर आणि केस गळतीने हैराण झालेल्यांसाठी जादुई तेल आल्याचा दावा केला जात आहे. यासाठी देशभरातील तरुण आणि मध्यमवयीन लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. दिल्लीतून आलेला सलमान भाई नावाचा माणूस हे तेल लावतो आणि त्यामुळे टकलावर केस उगवतात अशी बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली, परंतु सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर हा सलमान भाई हादरला आणि तिथून पसार झाला. इंदूरमधील डाकाचाइरा परिसरात टकलावर केस उगवणारे जादुई तेल घेऊन हा तथाकथित सलमान भाई आला होता. त्याच्याकडून टकलावर हे तेल लावून घेण्यासाठी तरुण, प्रौढ व्यक्तींपासून ते वृद्धांनी प्रचंड गर्दी केली होती. पहाटेपासूनच लोकांनी रांगा लावल्या होत्या. गर्दी इतकी वाढली की, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना तैनात करावे लागले.