अबब! दिवसाला 48 कोटी पगार, हिंदुस्थानी वंशाच्या सीईओची थक्क करणारी कमाई

 

हिंदुस्थानी वंशाच्या एका सीईओची कमाई थक्क करणारी आहे. जगदीप सिंग असे त्यांचे नाव आहे. त्यांचे वार्षिक वेतन 17 हजार 500 कोटी रुपये आहे. म्हणजेच दिवसाला त्यांचा पगार 48 कोटी रुपये आहे. हा आकडा एखाद्या कंपनीच्या वार्षिक उत्पन्नापेक्षाही मोठा आहे.

जगदीप सिंग ‘क्वांटमस्केप’ कंपनीचे संस्थापक आणि माजी सीईओ आहेत. त्यांनी कमावलेले यश म्हणजे केवळ त्यांचा वैयक्तिक लौकिक नसून हिंदुस्थानी टॅलेंटचा जागतिक स्तरावरील प्रभाव अधोरेखित करणारा आहे. सिंग यांच्या कंपनीमध्ये जगभरातील मोठे गुंतवणूदार आणि मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.

अशी घडली कारकीर्द

इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरीच्या तंत्रज्ञानावर काम करणारी क्वाटंमस्केप ही कंपनी जगभरातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची स्थापना जगदीप सिंग यांनी केली. त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून बीटेक, तर कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीए केले. स्वतःची कंपनी स्थापन करण्यापूर्वी जगदीप सिंग यांनी अनेक कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम करून स्वतःचा पाया भक्कम केला. बॅटरी तंत्रज्ञानाचा अनुभव घेतल्यानंतर स्वतःची कंपनी उभारली. या कंपनीचा नावलौकिक जगभरात झाला.