
देशातील सर्वात मोठी हवाई प्रवासी वाहतूक करणाऱ्या इंडिगो या कंपनीला आयकर विभागाने तब्बल 944 कोटी 20 लाखांचा दंड ठोठावला आहे. इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला 2021-22 या वर्षाकरिता आर्थिक व्यवहारांकरिता हा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र चुकीच्या समजुतीतून ही कारवाई करण्यात आली असून आयकर विभागाच्या नोटिसीला कायदेशीर आव्हान देणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कोविड काळात कंपनीचे नुकसान झाले होते. 2020-21 मध्ये 5,829 कोटी तर 2021-22 मध्ये 6,171 कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे आपल्याला आलेला दंड चुकीच्या माहितीतून आला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सध्या इंडिगो प्रत्येक आठवड्याला 15,914 फेऱ्या चालविते. अंतर्गत विमान वाहतूक सेवेत इंडिगोचा हिस्सा 60 टक्के इतका आहे.